कल्याण : वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस ठाण्याने मोठा दिलासा दिला आहे. ठाण्यात दाखल असलेल्या विविध तक्रारीमधील तब्बल १८ गहाळ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून हे सर्व मोबाईल शनिवारी तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.
कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गजानन देसले आणि अनिल शेंडगे यांनी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस. स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग अनिल लाड आणि टिटवाळा येथील कल्याण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कारवाई केली.
सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणानंतर गहाळ मोबाईलचे लोकेशन शोधण्यात आले. त्यानंतर सखोल तपास, चौकशी आणि पडताळणी करून हे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. तक्रारदारांनी आपल्या अमूल्य वस्तू परत मिळताच पोलिसांचे आभार व्यक्त केले.