* ई बाईक न वापरल्यास थेट मालकांवरच गुन्हा दाखल करणार
* प्रताप सरनाईक यांचे आदेश
ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रडारवर पुन्हा एकदा ॲप-आधारित रॅपीडो बाईक आली असून जर संबंधित कंपनीने ई बाईकचा वापर न केल्यास थेट मालकांवरच गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. यापूर्वीही मंत्री सरनाईक यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या रॅपीडो कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मंत्री प्रताप सरनाईक यांनी रॅपिडो आणि उबर यासारख्या ॲप-आधारित बाईक टॅक्सी कंपन्यांवर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे निर्देश यापूर्वीही दिले होते. या कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करत प्रवाशांची सुरक्षा धोक्यात घालत असल्याने त्यांनी हे आदेश दिले होते, परंतु काही दिवसांनी या कंपनीला पुन्हा सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र अजूनही या कंपन्यांच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करत ई बाईकचा वापर न करता इतर बाईकचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी मात्र कडक भूमिका घेतली आहे.
तीन दिवसांपासून सर्व आरटीओला सूचना देण्यात आल्या असून यासंदर्भात सक्त ताकीद देखील देण्यात आली असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. रॅपीडोला ई बाईक वापरण्याचीच परवानगी दिली आहे. मात्र अद्याप मोठ्या प्रमाणात ई बाईक सोडून इतर बाईकचा वापर करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. जे लोक नियमांचे पालन करणार नाहीत त्या बाईक वाल्यांवर गुन्हे दाखल न करता थेट मालकांवरच गुन्हे दाखल करा, असे आदेश सर्वच आरटीओला दिले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांवर गुन्हे दाखल करा मग १५० गुन्हे दखल झाले तरी चालतील मात्र आरटीओला खिशात घेऊन जाणार असेल तर प्रताप सरनाईक हे सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.