घराणेशाहीबद्दल कितीही बोटे मोडा, परंतु राजकारणातून तीस हद्दपार करणे कोणाच्याही बापाला शक्य नाही! आपल्या राजकारणाचे ते अविभाज्य अंग आहे आणि मूर्तीपूजा करणाऱ्या समाजाने नेत्यांना देवत्व बहाल केल्यामुळे घराणेशाहीशी प्रतारणा करणे तर अपवित्र, अशुद्ध आणि निष्ठेवर संशय निर्माण करण्यासारखे मानले जाते. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून लोकशाहीचे रक्षण करण्याचे उदात्त लक्ष्य डोळ्यासमोर ठेवणारे नेते आपल्या सात पिढ्यांची उत्तम आणि शाश्वत सोय कशी होईल हे पहात असतात.
घराणेशाहीविरुध्द एकेकाळी ‘ब्र’ ही न काढणारे कार्यकर्ते मात्र अलिकडे त्याबद्दल उघडपणे तर काही प्रकरणात कुजबुजीच्या स्वरुपात नाराजी व्यक्त करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. प्रभागवार बैठका होऊ लागल्या आहेत. इच्छुकांचे म्हणणे ऐकून घेतले जात आहे. अशाच एका पक्षीय बैठकीत एका इच्छुकाने उमेदवारीसाठी आग्रह धरला. आपण गेली अनेक वर्षे पक्षाचे इमाने इतबारे काम केले, आणि आता आपल्याला संधी मिळावी अशी रास्त अपेक्षाही त्याने व्यक्त केली. आता गंमत म्हणजे ही कैफियत ज्या नेत्यासमोर मांडली गेली त्याला त्याच्या घरातल्या सदस्याला तिकिट मिळावे असे वाटत आहे. त्यामुळे या नेत्यासमोर पेच निर्माण होणार आहे. जे कार्यकर्ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि ज्यांच्यामुळे आपल्याला सत्ता उपभोगता आली त्यांना नाराज तरी कसे करायचे हा तो पेच आहे. अशावेळी रक्ताचे नाते आणि पक्षाचे नाते यापैकी एकाची निवड करावी लागेल. हा निर्णय सोपा नसतो. त्यातून भावनिक कल्लोळ होतो . स्वार्थीपणाचा आरोप होण्याची भीती असते. घरातून सत्ता बाहेर गेली आणि ती परत आलीच नाही याची भीती असते. अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारे राजकारण नेत्याला गतस्मृती विसरायला लावू शकते. कधी काळी या नेत्यालाही असाच संघर्ष करुन उमेदवारी मिळवावी लागली होती. त्याच्या वाट्यालाही निराशा आणि अवहेलना आली होती. परिस्थितीशी त्यानेही अनेकदा समझौता केलेला असतो. घराणेशाहीचा अभिशाप त्यानेही भोगलेला असतो. नेत्याचा रागही आलेला असतो. इतकेच काय बंडखोरीचा विचार त्याच्या मनात डोकावून गेलेला असतो. असे सारे सहन केल्यावर आपल्या हातून असा अन्याय होणार नाही हा विवेक मात्र त्याला हुलकावणी देत रहातो. तो सर्व काही विसरलेला असतो. रक्ताची नाती घट्ट असतात, असे म्हणतात ते उगाच नाही. बायको , मुलगा, भाऊ यानाच पक्षाने तिकीट द्यावे यावर तो ठाम राहतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. ते एका कार्यक्रमात म्हणाले, २०-२० वर्षे काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता तिकीट मागतो त्यावेळी एखादा मंत्री म्हणतो, माझ्या बायकोला किंवा मुलाला तिकीट द्या तेव्हा खूप वाईट वाटते. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या वारसदारांना जनतेने पाडल्यास परत कोणीच उभे करणार नाही. श्री.गडकरी यांचे हे विधान आम्ही मांडत असलेल्या विचारांशी सुसंगत आहे किंबहुना त्यांच्यासारख्या एका बुजुर्ग नेत्याने हा विचार मांडणे घराणेशाहीच्या एकूण आजच्या स्वरूपाबद्दल केलेले अत्यंत बोलके विधान आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांचे वर्णन खुद्द नेतेच ‘दुकान’ म्हणून करू लागले होते. दुकानदाराच्या पिढ्यांनी गादी चालवणे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घराणेशाहीचा कित्ता गिरवणे यात फरक आहे. दुकानदाराच्या पुढच्या पिढीला व्यवहाराचे ज्ञान उपजत भिन्न असते. आणि दुकान ही त्याची खाजगी मालमत्ता असल्याने अशा घराणेशाहीचा कुणी आक्षेपही घेत नसतो. परंतु राजकीय पक्ष ही कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे आणि त्यात होणारी गुंतवणूक कोण्या एका नेत्याची असती तर ती संघटनात्मक असते आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा ‘ स्टेक होल्डर ‘ असतो. त्याचा पक्षाच्या जडणघडणीत खारीचा का होईना, वाटा असतो. आणि त्याचे योगदान त्याला तिकीट मागण्यापर्यंतचा हक्क बहाल करत असतो. हा विचार केला तर घराणेशाहीचे समर्थन होऊ शकत नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनिअरची पुढची पिढी इंजिनिअर किंवा वकिलाने आपल्या पूर्वजांचा वारसा चालवणे या गोष्टी घराणेशाहीत मोडू शकत नाहीत. कारण तिथे औपचारिक शिक्षणाबरोबर त्याच्या गुणवत्तेचा कस लागत असतो. या कसोटीतून नेत्यांच्या पुढच्या पिढ्या सुटत आल्यामुळे आपल्याकडे घराणेशाही रुजली आणि वाढली. मक्तेदारीचा हा मार्ग गैर असल्याचे आता अधिक स्पष्टपणे बोलले जाऊ लागल्यामुळे श्री.गडकरी यांच्या मनातली भीती खरी ठरते.
मग अशावेळी राजकारणात नव्या रक्ताला संधी मिळणारच नाही का? कार्यकर्त्यांनी नेहमीच सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का, हा गुळगुळीत झालेला प्रश्न अशावेळी डोकावू लागतो. निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही जीवंत ठेवण्याचे काम होत असते, तिथे घराणेशाहीमुळे मक्तेदारी हा लोकशाहीविरुद्ध प्रवाह सुरुच कसा होतो? म्हणजे लोकशाहीचा मर्यादित आणि सोयीचा अर्थ काढला जातो काय? तिकिट मागणाऱ्या शेकडो इच्छुकांच्या मनात सध्या या प्रश्नांनी थैमान घातले आहे. त्यावर वेळीच उत्तर मिळाले तर नेत्याची प्रतिमा आणि पक्षाचे भवितव्य सुरक्षित राहू शकते. अन्यथा नाराजी-नाट्य, बंडखोरी, पक्षांतरे वगैरे सुरुंग पेरले जाऊ शकतात. सध्याच्या राजकीय स्थितीत घराणेशाहीचा अट्टाहास करणे परवडणारे नाही. प्रतिस्पर्धी पक्ष अशा प्रभागांवर विशेष लक्ष ठेऊन असतात. ते संधीचा फायदा घेण्यासाठी टपून बसलेले असतात. नेत्यांना हे ठाऊक असते. मग अशावेळी त्यांनी काय करावे? आमच्या मते उमेदवार ठरवताना त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची चित्रफीत डोळ्यासमोर आणावी. थोडी रिवाईंड करावी आणि फॉरवर्ड करण्यापूर्वी, पॉजचे बटण दाबावे! कदाचित त्यामुळे त्याना घराणेशाहीचा नाद सोडून देण्याची सुबुद्धी होईल. त्यांची प्रतिमा त्यात उजळून निघू शकेल. लोकशाहीचे संवर्धन घरापासून सुरू होऊ शकते, मन मोठे करण्याची काय ती गरज आहे. बघूया काय होते ते.