उल्हासनगर : शिवसेना-भाजपा युतीबाबत निर्माण झालेल्या चर्चेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले आहे. “युती टिकवायची की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. आम्ही युतीत काम करीत आहोत आणि पुढेही युतीत काम करणार आहोत. युती टिकवायची की नाही याचा विचार त्यांनीच करावा, असा टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना लगावला.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील बालकनजी बारी ट्रस्ट संचालित “सोबर लाईफ महिला नशामुक्ती केंद्रा”चे उद्घाटन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्षा जया मोहन साधवानी, सचिव मोहन साधवानी, शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, माजी महापौर मीना आयलानी, डॉ. आभा नगराळे, माजी आमदार पप्पू कलानी तसेच इतर मान्यवर व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अलीकडेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी “२ डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे; तोपर्यंत काही गोष्टी आम्ही सहन करू” असे वक्तव्य केले होते. या विधानाचा उल्लेख होताच खासदार शिंदे यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत म्हटले: “अशा विधानांची आम्ही दखल घेत नाही. आम्ही युतीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण युती झाली नाही. मात्र आम्ही युतीत होतो, आहोत आणि राहणार.”
नवीन सुरु झालेल्या महिला नशामुक्ती केंद्रात ३० महिलांसाठी निवास व उपचाराची सोय करण्यात आली आहे. तर ट्रस्टद्वारे चालविले जात असलेल्या पुरुष नशामुक्ती केंद्रात सध्या २५ पेक्षा अधिक पुरुष उपचार घेत आहेत, अशी माहिती संचालक विशाल साधवानी यांनी दिली.