सर्वपक्षीय उमेदवारांची घोर निराशा
अंबरनाथ: न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे तर कुळगांव-बदलापूरमधील सहा प्रभागांतील निवडणुका २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबरला घेण्यात येणार आहेत. निवडणुका पुढे ढकलल्याने सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.
नगरपरिषदेचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 4 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. तर 2 डिसेंबर रोजी अंबरनाथमध्ये प्रत्यक्षात मतदान होणार होते. मात्र 29 नोव्हेंबर रात्री उशिरा निवडणूक आयोगाकडून, न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. तब्बल 18 दिवस निवडणूक पुढे गेल्याने निवडणुकीतील जोश कमी झाल्याचे दिसून आले. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नवीन निवडणूक कार्यक्रमानंतर अंबरनाथ नगरपरिषदेतील निवडणूक अधिकाऱ्यांनी अंबरनाथ मध्ये कोणतेही अपील प्रलंबित नसून सर्व प्रक्रिया सुरळीत झाल्याने अंबरनाथ मध्ये निवडणूक प्रक्रिये बाबत मार्गदर्शन मागवण्यात आल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंबरनाथमध्ये 17 नोव्हेंबरपर्यंत सदस्यपदासाठी 400 अर्ज, तर नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची छाननी 18 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर त्यातील 13 प्रकरणामध्ये जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होऊन, 25 नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आला. त्यातील एक अपील हे नगराध्यक्ष पदासाठीचे होते. ते अपील न्यायालयाने फेटाळले होते. त्यामुळे कोणतेही अपील अंबरनाथमध्ये प्रलंबित नसल्याने अंबरनाथमध्ये नवीन निवडणूक कार्यक्रम अमलात आणावा का? याबाबत माहिती मागविण्यात आली होती. मात्र कोणतेही मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने अंबरनाथची निवडणूक 20 डिसेंबर रोजीच होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
बदलापुरात सहा प्रभागांत निवडणूक स्थगित
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक १५ ब, प्रभाग क्रमांक १७ अ, प्रभाग क्रमांक १० ब, प्रभाग क्रमांक ८ अ, प्रभाग क्रमांक ५ ब व प्रभाग क्रमांक १९ अ या प्रभागात २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाला स्थगिती देण्यात आली आहे. उर्वरित सर्व प्रभागात पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे २ डिसेंबरला मतदान होणार आहे. तर स्थगिती देण्यात आलेल्या सहा प्रभागात २० डिसेंबरला मतदान होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गुजर यांनी स्पष्ट केले. निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेल्या सहा प्रभागात ४ डिसेंबरला निवडणुकीचा नवीन कार्यक्रम जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १० डिसेंबर ही अखेरची तारीख असेल. ११ डिसेंबरला उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून त्यांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. तर २० डिसेंबरला या सहा प्रभागात मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी नवीन उमेदवार अर्ज दाखल करू शकणार नाही.
नगर परिषदेतील सहा जागांवर उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले होते. त्यानंतर या उमेदवारांनी न्यायालयात अपील दाखल केले होते. या सर्व प्रकरणात न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय योग्य ठरविला. त्यामुळे सहा जागांवर उमेदवार म्हणून शिल्लक असलेल्या पाच उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नियमानुसार तीन दिवसांचा कालावधी न मिळाल्याने या सहा प्रभागात निवडणूक आयोगाने सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.