डोंबिवलीत सावळाराम क्रीडासंकुलात उभी राहणार अत्याधुनिक क्रीडानगरी

कल्याण: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात २० एकरच्या भूखंडावर अत्याधुनिक क्रीडानगरी उभी राहणार आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण १८१ कोटींची निधीची तरतूद आहे. ५५ कोटीचा निधी अलीकडेच या कामासाठी शासनाकडून उपलब्ध झाला आहे.

विविध खेळ प्रकारांच्या सुविधा या क्रीडानगरीत उपलब्ध होणार असून ठाणे जिल्ह्यातील खेळाडुंना सर्व प्रकारच्या खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एमआयडीसीकडून या नव्या क्रीडानगरीची उभारणी केली जाणार आहे.

सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील अत्याधुनिक क्रीडानगरीसाठी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे गेल्या तीन वर्षापासून प्रयत्नशील होते. ठाणे जिल्ह्यातील खेळाडुंना एका छताखाली अत्याधुनिक खेळ प्रकारांच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी सावळाराम क्रीडासंकुलात या सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून खासदार डाॅ. शिंदे शासनस्तरावर प्रयत्नशील होते. खासदार डाॅ. शिंदे यांच्या प्रयत्नातून या कामासाठी पहिल्या टप्प्यात ५५ कोटीचा निधी उपलब्ध झाल्याने या कामांना एमआयडीसीकडून लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. यामध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या टप्पा १ मधे इंडोर क्रीडासंकुल आणि ऑलिंपिक दर्जाचा तरणतलाव उभारण्यात येणार आहे. टप्पा दोन मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

या क्रीडासंकुलाची उभारणी नियोजन प्राधिकरण एमआयडीसी त्यांच्या निधीतून करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाची देखभाल व व्यवस्थापन कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सोपविण्यात येणार आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. त्याचसोबत एक हजार दोनशे पन्नास चौ.मी. क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव, चारशे चौ.मी. डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म, तसेच सोळा हजार चौ.मी. तळघर पार्किंगची सोय निर्माण केली जाणार आहे.

या संकुलात इनडोअर क्रीडा संकुलात योगा, जिमनॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नुकर, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील. त्याचबरोबर आदरातिथ्य व निवास व्यवस्था, भव्य बॅक्वेट हॉल्स, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र आणि बहुपयोगी सभागृह देखील या प्रकल्पाचा भाग आहे.