भिवंडीत कापड गोदामाला भीषण आग

ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात कापड गोदामाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. या आगीवर ११ तासानंतर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. आगीत कोणतीही दुर्घटना झाली नसल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिली.

काल्हेर येथील बांगर नगर परिसरातील राजलक्ष्मी काॅम्प्लेक्स येथे कापड गोदाम आहे. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागली. गोदामात कापड असल्याने अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरात आगीचे आणि धुराचे लोट पसरू लागल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर भिवंडी, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पाण्याचे टँकर आणण्यात आले. सुमारे ११ तासानंतर येथील आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. या आगीत कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून स्पष्ट करण्यात आले. परंतु आगीमुळे गोदामाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.