पुणे : ग. दि. माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमा प्रतिष्ठानतर्फे १४ डिसेंबर रोजी गदिमा स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त देण्यात येणारा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त शिवराम कोल्हटकर आणि प्रा. प्रकाश भोंडे उपस्थित होते.
२१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप आहे. यासह विविध पुरस्कारांचे वितरण १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात आणि त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आनंद माडगूळकर लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘माझ्या खिडकीतून गदिमा’ या ग्रंथाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यंदाचा गृहिणी सखी सचिव पुरस्कार नादब्रह्म या शास्त्रीय आणि सुगम संगीताला वाहिलेल्या संस्थेसाठी रवींद्र घांगुर्डे यांच्याबरोबर योगदान देणार्या वंदना रवींद्र घांगुर्डे यांना देण्यात येणार आहे. ११ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नव्या उभारीच्या कलावंताला दिला जाणरा चैत्रबन पुरस्कार यंदा प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देण्यात येणार आहे. ५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच स्वर्गीय विद्या माडगूळकर आणि त्यांच्या कन्या प्रज्ञा उदय पाठक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा विद्या प्रज्ञा पुरस्कार यावर्षी तरुण प्रतिभावंत गायिका मुग्धा वैशंपायन यांना देण्यात येणार आहे. ५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी गदिमांचे निस्सीम चाहते आणि गदिमांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या साहित्यावर पहिला प्रबंध सादर करणारे सांगली जिल्ह्यातील जत येथील निवासी डॉ. श्रीपाद जोशी यांचा यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी गदिमांचे कनिष्ठ बंधू आणि ज्येष्ठ कवी अंबादास माडगूळकर यांच्या स्मरणार्थ गदिमांनी लिहिलेल्या देशभक्तीपर गीतांचा समावेश असलेला वंद्य वंदे मातरम हा कार्यक्रम स्वरानंद प्रतिष्ठानचे कलाकार सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आनंद माडगूळकर, शिवराम कोल्हटकर आणि प्रा. प्रकाश भोंडे यांनी केले आहे.