राबोडीत अशुद्ध पाणी; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ठाणे: राबोडी परिसरात गटाराचे पाणी पिण्याच्या मुख्य जलवाहिनीत मिसळल्यामुळे परिसरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

राबोडी परिसरात नळाद्वारे मिळणारे पाणी दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध असल्याने नागरिक आजारी पडले असून अनेकांना पोटाच्या तक्रारींसह विविध आजारांनी ग्रासले आहे. पाण्याचा रंग काळा झाला असून त्यातून गटाराच्या पाण्याचा तीव्र वास येत आहे. या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांना हजारो रुपयांच्या औषधोपचाराचा खर्च सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे.

राबोडीतील नागरिकांना शुद्ध पाणी मिळाले नाही, तर ठाणे काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात येईल. अशुद्ध पाण्यामुळे कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा ठाणे काँग्रेसचे नेते ॲड. जावेद शेख यांनी दिला आहे. नागरिकांनी तत्काळ शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.