ठाण्यातील दिग्गजांना घ्यावा लागणार नवीन प्रभागांचा शोध

परिवहन मंत्र्यांच्या पुत्रासह भाजप, शिंदे गट, शरद पवार गटालाही आरक्षणाचा धक्का

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत पार पडली. आरक्षणामध्ये फारसे बदल झाले नसले तरी काही दिग्गज माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला असून त्यांना उमेदवारीसाठी नवीन प्रभागाचा शोध घ्यावा लागणार आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यासह भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील काही दिग्गजांना या आरक्षणाचा फटका बसला आहे. निवडणुकीमध्ये या सर्व दिग्गजांना वेगळा प्रभाग निवडावा लागणार आहे तसेच तिकीट मिळवताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता मंगळवारी सोडत काढण्यात आली. राम गणेश गडकरी रंगायतन येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीला सुरवात झाली. या आरक्षण सोडतीत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. परंतु काही मोजक्या मात्र महत्वाच्या दिग्गजांना यात फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये साधना जोशी या शिंदे सेनेच्या माजी नगरसेविकेला आरक्षणाचा फटका बसला आहे. या ठिकाणी अनुसुचित जमाती पुरुष आरक्षण आले आहे. दुसरीकडे प्रभाग क्रमांक दोन मध्येही भाजपच्या कविता पाटील यांना फटका बसला आहे. २ ब हा नागरीकांचा मागस प्रवर्ग मध्ये पुरुषांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे त्यांना याठिकाणी कदाचित आपल्या घरातील कोणालातरी लढवावे लागणार आहे. तिकडे प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिंदे सेनेचे मधुकर पावशे यांना फटका बसला आहे. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना फटका बसला असला तरी त्या बाजूच्या वॉर्डातून लढू शकणार आहेत. तिकडे येऊरला देखील शिंदे सेनेचे नरेंद्र सुरकर यांचा वॉर्ड महिलेला गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील त्यांना पर्याय द्यावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादीचे दिगंबर ठाकुर आता शिंदे सेनेत असून यांना फटका बसला असून येथे महिला आरक्षण पडले आहे.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिंदे सेनेचे जुने माजी नगरसेवक देवराम भोईर यांना देखील आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे. आता त्यांना पर्यायी वॉर्ड शोधावा लागणार आहे. किंवा कुटुंबातील सदस्यांची अदलाबदल करुन वॉर्ड मिळवावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक १० अ मधून मागील कित्येक वर्षे अजित पवार गटाचे दिग्गज समजले जाणारे नजीब मुल्ला यांना देखील काहीसा फटका बसला आहे. परंतु त्यांना क किंवा ड वॉर्डातून लढण्याची संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक ११ मध्ये दिपा गावंड (भाजप) यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. याच प्रभागातील भाजपचे कृष्णा पाटील यांना देखील आता पर्याय शोधावा लागणार आहे. याच प्रभागात कृष्णा पाटील यांच्या पत्नी नंदा पाटील आणि मिलिंद पाटणकर देखील आहेत. परंतु आता पाटील यांच्या भावाने देखील तिकीट मागितले आहे. त्यामुळे या प्रभागातून आता तिकीट देतांना भाजपची मोठी कसरत होणार आहे. प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये भाजपच्या सुवर्णा कांबळे यांच्यासह ब वार्डातील एकनाथ भोईर यांना देखील मोठा फटका बसला आहे. त्यांनी तर महापौर पदाचे स्वप्न पाहिले होते. परंतु आता त्यांना आजूबाजूचा पर्याय देखील नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते कोणता पर्याय निवडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. १६ अ मध्ये मनिषा कांबळे यांना तर २२ अ मध्ये भाजपचे सुनील हंडोरे यांना फटका बसला आहे.

दिव्यात राष्ट्रवादीतून शिंदे सेनेत गेलेल्या प्रभाग २९ अ मधील बाबाजी पाटील यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांच्या वॉर्डात महिलेचे आरक्षण पडले आहे. प्रभाग क्रमांक ३० अ मध्ये शेख हसिना अब्दुल अजीज ( राष्ट्रवादी ), यांना फटका बसला आहे. तर तळ्यात मळ्यात राहणारे ३१ क चे माजी नगरसेवक राजण किणे यांना देखील आता बाजूच्या प्रभागाचा पर्याय निवडावा लागणार असल्याचे दिसत आहे.

प्रभाग क्रमांक १४ अ मधून पूर्वेश सरनाईक हे निवडून आले होते. परंतु आता जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत त्यांच्या वॉर्डात महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे त्यांनी इतर वॉर्डात जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना कसरत करावी लागणार आहे. कारण इतर वॉर्डात देखील मागील कित्येक वर्षापासून निवडून येणाऱ्या शिंदे यांच्या सेनेच्या शिलेदारांचे प्राबल्य आहे.

शरद पवार गटाचे खंद्दे समर्थक मानले जाणारे शानू पठाण यांना देखील आरक्षणाचा फटका बसला आहे. ३२ क मधून ते मागील वेळेस निवडून आले होते. परंतु आता हा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांना आता आपल्या मुलीला संधी द्यावी लागणार असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांना बाजूच्या वॉर्डाचा पर्याय देखील दिसत नाही.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे, पुर्वेश सरनाईक, मधुकर पावशे, नरेंद्र सूरकर, देवराम भोईर, कविता पाटील, कृष्णा पाटील, दिपा गावंड, नंदा पाटील, नजीब मुल्ला, एकनाथ भोईर, सुनील हंडोरे, बाबाजी पाटील, शानू पठाण आदी माजी नगरसेवकांना या आरक्षण सोडतीचा फटका बसला आहे.

कार्यकर्त्यांची इच्छा आहे, महायुती व्हावी, त्यानुसार महायुती होईलच शिवाय ठाणे महापालिकेवर भगवा फडकेल असा विश्वास शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के, भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आणि अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी विश्वास व्यक्त केला आहे. परंतु दुसरीकडे ज्यांचे संख्याबळ अधिक असेल त्यांचाच महापौर होईल असा दावा भाजपने केला आहे. तर महापौर बसविण्यात निर्णायक भूमिका ही आमचीच असेल असा दावा अजित पवार गटाने केला आहे. शिवाय युती होईल की महायुती हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल असे सांगत एकप्रकारे युती बाबत साशंकताही या नेत्यांनी उपस्थित केली आहे.