आरक्षणाची लागणार तड; महिलांचेच पारडे जड

ठामपाच्या आजच्या सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष

ठाणे: आगामी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहिर होणार आहे. यावेळी देखील महिला राज येणार आहे, त्यामुळे उद्या कोणत्या आरक्षित जागेवर महिलांचे आरक्षण पडते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठामपा निवडणूक चार पॅनल पद्धतीने होणार आहे. ३३ प्रभागांसाठी होणार्‍या या निवडणुकीसाठी ५० टक्के जागा आधीच महिलांसाठी राखीव आहेत.

ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार उद्या मंगळवारी आरक्षण सोडत जाहिर करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी येथे सकाळी दहा वाजता या सोडतला सुरुवात होणार आहे. यामध्ये ५० टक्के राखीव असलेल्या महिलांच्या अनुसुचित जाती, जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तसेच राखीव जागांव्यतरिक्त नागरिकांचा मागास प्रवर्गसाठीही सोडत काढण्यात येणार आहे. सोडत काढल्यानंतर १७ नोव्हेंबरला आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करून २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती सुचना स्विकारल्या जाणार आहेत. त्यानंतर अंतीम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहे.

२०१७ प्रमाणेच ठाणे महापालिकेची निवडणूक चार सदस्य पॅनल पद्धतीने होणार आहे. एकूण ३३ प्रभागांमध्ये १३१ नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यापैकी निम्मे म्हणजे ६६ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेतील महिलाराज कायम राहणार आहे. मात्र या राखीव जागांमध्ये कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार हे मंगळवारी निघणार्‍या आरक्षण सोडतीनंतर कळणार आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जशी प्रभाग रचना होती तशीच २०२५ च्या निवडणुकीसाठी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे इच्छूकांचे लक्ष लागले आहे.

आरक्षणाची स्थिती

अनुसुचित जाती (एकूण ९ जागा): महिलांसाठी राखीव ५, अनुसुचित जमाती: एकूण ३ जागा, महिलांसाठी राखीव २,
नागरिकांचा मागासवर्ग: (एकूण जागा ३५): महिलांसाठी राखीव १८, अनुसूचित जमातीकरिता राखीव प्रभाग १, २ आणि ५, अनुसूचित जातीकरिता राखीव प्रभाग ३, ६, ७, ९, १५, १६, २२, २४ आणि २८ हे आहेत.