नवी मुंबई महापालिकेकडून ५९ विकासकांना नोटीसा
नवी मुंबई: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वायू, ध्वनी प्रदूषण आणि ब्लास्टींग करणाऱ्या विकासकांनी दिलेल्या नोटीशीनुसार त्वरित उपाययोजना न केल्यास त्यांच्या बांधकामांना स्थगिती आदेश देण्यात येतील, असा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. दोषी ५९ विकासकांना मागील महिन्यात नोटीसा बजावण्यात आल्याचे अचिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
उच्च न्यायालयाचे आदेश आणि बांधकामांच्या ठिकाणी होत असलेले ध्वनी आणि वायू प्रदूषण याबाबत नागरिकांकडून होत असलेल्या तक्रारी विचारात घेता त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व मान्यतेने ‘मानक कार्यप्रणाली तयार करुन 1 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्या मानक कार्यप्रणालीची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात अंतर्भूत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही बांधकामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांमध्ये होणाऱ्या ध्वनी व वायू प्रदूषणाबाबतच्या मानक प्रणालीची पूर्तता होत नसल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने 12 ऑक्टोबर 2025 रोजी या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रत्यक्ष जागेची पहाणी करुन सदर मानक प्रणालीचे उल्लघंन होत असलेल्या एकूण ५९ विकासकांना 24 ऑक्टोबर 2025 रोजी सदर मानक प्रणालीची पूर्तता करण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. याबाबत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नगररचना विभागामार्फत सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच विकासक व वास्तुविशारद यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये सहायक संचालक नगररचना यांनी सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक कुंपण बांधणे, बांधकाम साहित्य व राडा-रोडा साहित्य ने – आण करणाऱ्या वाहनांच्या चाकांची स्वच्छता करणे, पदपथ मोकळे व स्वच्छ ठेवणे, ठरवून दिलेल्या विहित वेळेत काम पूर्ण करणे, फॉगर्स लावणे, स्प्रिंकलर बसविणे, सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे इ. बाबींची पूर्तता करणेबाबत सर्व विकासक, वास्तुविशारद व त्यांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यात आली.
ज्या विकासकांकडून मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन होईल अशा विकासकांना दंड आकारण्यात येईल तसेच, समाधान न झाल्यास पर्यायाने ‘मानक कार्यप्रणालीचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांच्या कामांना स्थगिती आदेश देण्याची कठोर कार्यवाही करण्यात येईल असे सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांनी सूचित केले आहे.