रिक्षेत विसरलेला सोन्याचा ऐवज परत; रिक्षा चालकावर गुन्हा

डोंबिवली: कोकणातील एक महिला डोंबिवलीत पिसवली येथे रिक्षेतून उतरल्यावर तिचा सोन्याचा ऐवज असलेली पिशवी रिक्षेतच राहिली. मात्र रिक्षा चालकाने भाडे घेतल्यानंतर पळ काढला. याप्रकरणी कल्याण गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल होताच, गु्न्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने टिटवाळा येथील रिक्षा चालकाला अटक केली.

बालिका गवस (५६) असे तक्रारदार महिलेचे नाव असून ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग झरे बांबर गावची रहिवासी आहे. दिवाळीनिमित्त कल्याणमधील पिसवली, डोंबिवलीतील स्टार काॅलनी येथील आपल्या मुलीकडे आल्या होत्या. डोंबिवलीतील मुलीची भेट घेतल्यानंतर बालिका गवस यांनी पिसवली येथे रिक्षेने जाण्याचा निर्णय घेतला. रिक्षेतून जाताना कोणाची नजर पडू नये म्हणून महिलेने गळ्यातील साडे तीन लाखाहून अधिक किमतीचे मंगळसूत्र जवळील पिशवीत काढून ठेवले. रिक्षेतून उतरल्यावर महिलेने रिक्षा चालकाला भाडे दिले. भाडे घेतल्यानंतर बालिका गवस यांना रिक्षेतून पिशव्या उतरून घेण्याची कोणतीही संधी न देता रिक्षा चालक सुसाट वेगाने निघून गेला. या महिलेला नेण्यासाठी तिची पिसवली येथील मुलगी रिक्षा वाहनतळावर आली. बालिका यांनी घडला प्रसंग मुलीला सांगितला. बालिका यांचा जावई योगेश सावंत यांनी ही माहिती तत्काळ कल्याण गु्न्हे शाखेच्या पथकाला दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, स्वतंत्र तपास पथके तयार केली.

बालिका गवस डोंबिवलीत स्टार काॅलनी येथे ज्या ठिकाणी रिक्षेत बसल्या होत्या. तेथून ते पिसवलीपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांनी तपासले. त्यावेळी त्यांना एका रिक्षा चालकाचा वाहन क्रमांक मिळाला. त्या वाहन क्रमांकावरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालक जयेश वसंत गौतम (३२) याला ताब्यात घेतले. ते टिटवाळा गणेशवाडी भागात राहतात.