नौपाड्यातील सरस्वती मंदिर शाळेचा अभिनव उपक्रम
ठाणे: शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरण आणि शेतीचे ज्ञान मिळावे यासाठी नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या शाळेने कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांच्या संकल्पनेतून अनंताश्रम ट्रस्ट आणि शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली पेरणी ते कापणी हा उपक्रम सलग दुसऱ्या वर्षी राबवला. पावसाळ्याच्या सुरुवातीला या विद्यार्थ्यांनी केलेल्या पेरणीनंतर डोलणारी भात पिके कापणीचा अनुभवही विद्यार्थ्यांनी घेतला.
पर्यावरण आणि शेतीचा अनोखा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर स्वतः कष्ट करून पेरणी केलेला भात कापताना आनंद ओसंडून वाहत होता. येऊर येथील पाटोणपाडा येथे ५ नोव्हेंबर रोजी सरस्वती शाळेने कापणीचा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे, माजी विद्यार्थी रोहित जोशी, अनंताश्रम ट्रस्टचे कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. भाताची कापणी करताना विद्यार्थ्यांनी निसर्गाप्रती आपले प्रेम, संगीत आणि नृत्याद्वारे व्यक्त केले. हा महोत्सव विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठी सुद्धा आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला आहे.
जिथे आपण रोज खातो ते अन्न कसे पिकवले जाते, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देत असताना, शेतकऱ्यांचे कष्ट आणि शेतीसमोरील अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. सततच्या पावसामुळे भातशेतीसारख्या पिकांवर येणारे संकट, हे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर आणि देशाच्या अन्नसुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या पार्श्वभूमीवर बाल्यावस्थेतच विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी जाणीव जागृती निर्माण करणे, हे येणाऱ्या काळासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीबाबत पुस्तकी ज्ञानासोबतच, विद्यार्थ्यांना शेतीची प्रत्यक्ष माहिती, तिचे महत्त्व आणि त्यातील आव्हाने यांची ओळख करून देणे आवश्यक आहे. यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रेम, आदर आणि अन्नदात्याबद्दल कृतज्ञता निर्माण होईल. या उद्देशाने सरस्वती शाळा पेरणी ते कापणी हा उपक्रम गेली दोन वर्षे राबवत आहे. शाळेकडून या उपक्रमाद्वारे, शेती शिक्षण हा अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग बनवला जात आहे.
विद्यार्थ्यांना शेतीची प्रक्रिया, रोवणीपासून कापणीपर्यंत, प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणे,
हवामान बदलाची जाणीव, हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांबद्दल आणि त्यावरील उपायांबद्दल माहिती देणे, शेतकऱ्यांचे कष्ट आणि त्यांचे महत्त्व याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता वाढवणे, विद्यार्थ्यांना निसर्गाशी आणि पर्यावरणाशी जोडणे, हा उद्देश या उपक्रमागे होता, अशी माहिती श्री.दिघे यांनी दिली.