जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेचे आंदोलन सुरू
ठाणे: बुधवारपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी `आत्मक्लेशातून आत्मनिर्धार’ मौन पाळून आंदोलनास सुरुवात केली.
निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री, कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेठबिगारी, स्थलांतरामुळे अर्ध्यावर राहिलेले शिक्षण आणि बालमृत्यूच्या वाढत्या घटना यामुळे कातकरी समाजाचे जीवन अंध:कारमय झाले आहे. वनहक्क, गावठाण हक्क आणि मुक्त वेठबिगारांचे पुनर्वसनाचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, बाळाराम भोईर, विजय जाधव, अशोक सापटे, सुरेश रेंजड, सीता घाटाल, पूजा सुरूम-माळी, रुपेश डोळे, जया पारधी, रेखा पऱ्हाड आणि इतर कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करत आहेत.
आंदोलनादरम्यान प्रत्येक गाव-पाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करुन सायंकाळी प्रत्येक गावा गावात, पाड्या-पाड्यात आणि घरा-दारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिकात्मक दिवा लावणार आहेत.
आत्मक्लेशातून आत्मनिर्धार हा ५ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर असे दोन दिवस होत आहे. गुरुवारी ६ नोव्हेंबरला ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर वस्तीच्या तयारीत धडकणार आहेत. हा केवळ संघर्ष नसून परागंदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीचा ‘निर्धार’ आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे.