भातसा धरणातून लाखो लिटर पाण्याची गळती

शहापूर: भातसा धरणातून पाण्याची गळती होत असल्याची दृश्ये समोर आली आहेत. धरणाच्या भिंतीमधून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. धरणाच्या मुख्य भिंतीतून व इतर ठिकाणाहून प्रती सेकंद ५०० ते ७०० लिटर पाण्याची गळती होत असल्याचा अंदाज आहे. यावर योग्यवेळी दुरुस्तीचे उपाय न केल्यास भविष्यात धरणाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. संबंधित विभागाने तातडीने तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई व उपनगरांचे जीवनदायी स्रोत असलेले भातसा धरण अलीकडच्या काळात पाणी गळतीच्या समस्येमुळे चर्चेत आले आहे. धरणाच्या विविध भागांतून पाण्याची झिरप सुरू असून यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काही महिन्यांपासून धरणाच्या तळभागातून आणि बाजूच्या संरचनेतून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

भातसा धरणातून मुंबई महानगरपालिकेस दररोज २१२० एमएलडी तर ठाणे महापालिकेला दररोज २५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. अशा स्थितीत धरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होणे म्हणजे जनजीवनाशी थट्टा असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, धरणाची नियमित तपासणी, गळतीचे मूळ कारण शोधणे आणि तांत्रिक तज्ञ समितीकडून तातडीने अहवाल घेणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते आणि शेतकरी संघटनांनी व्यक्त केली आहे.

तज्ज्ञांच्या मते, धरणांमध्ये पाण्याचा सूक्ष्म प्रवाह नैसर्गिक असू शकतो; मात्र सतत आणि तीव्र स्वरूपातील गळती गंभीर इशारा मानला जातो. पावसाळा नुकताच ओसरलेला असताना अशी स्थिती दिसून आल्याने आगामी काळात संभाव्य धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान धरण गळतीचा मुद्दा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे धरणाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तांत्रिक समितीची तपासणी झाली आहे का आणि राज्य शासनाकडून गळती काढण्यासाठी निधी मंजूर झाला आहे का याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.

भातसा प्रकल्पाचे उद्दीष्ट
बृहन्मुंबई महानगरपालिकेस वर्षातील २८५ दिवस पिण्यासाठी रोज १३६५ दशलक्ष लिटर (३०० द.ल. गॅलन) पाणी पुरवठा करणे. सद्यस्थितीत भातसा धरणामधून बृहन्मुंबई महानगरपालिकेस २१२० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा होतो. याव्यतिरिक्त ठाणे महानगरपालिकेस २५० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. डाव्या आणि उजव्या तीर कालव्याद्वारे शहापूर, भिवंडी, कल्याण या तालुक्यातील एकूण ९ हजार १९० हेक्टर क्षेत्रात सिंचनासाठी पाणी पुरविले जाते. पाणी पुरवठ्यासाठी धरणातून पाणी सोडताना त्यापासून १५ मे.वॅट वीजनिर्मिती केली जाते.