हरवलेले, चोरीस गेलेले मोबाईल तक्रादारांच्या स्वाधीन

अंबरनाथ: पश्चिम पोलीस ठाण्याच्या वतीने नुकताच मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी ४५पेक्षा अधिक नागरिकांचे हरवलेले, चोरी झालेले मोबाईल फोन त्यांना परत करण्यात आले.

दिवाळीच्या मुहूर्तावर हरवलेले चोरीस गेलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. अंबरनाथ विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या हस्ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून परत देण्यात आले.

अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईल फोनचे आयएमईआय नंबर, सायबर विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या साहाय्याने हे मोबाईल हस्तगत केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे हरवलेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले. यामध्ये काही मोबाईल हे इतर राज्यातून देखील ताब्यात घेण्यात आले. या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक बळकट झाला आहे. आपले हरवलेले, चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.