एमपीएससीच्या समाजकल्याण अधिकारी परीक्षेचा निकाल जाहीर

केदार गरड राज्यातून पहिला

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या पदांच्या परीक्षांना सुधारित आरक्षण निश्चितीसाठी स्थगिती देण्यात आली होती. १८ ऑगस्टला ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातून केदार गरड पहिला तर वैभव भुतेकर दुसरा आला आहे.

‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत.

‘एमपीएससी’ने मे २०२३ मध्ये समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व संबंधित गट अ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ४१, समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग २२, गृह प्रमुख, गट ब, समाज कल्याण आयुक्तालय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील १८ अशा विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज केले होते. दोन दिवसापूर्वी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यातील शेकडो उमेदवारांना यश आले आहे.

वैभव भुतेकर यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी आपल्या गावातच केली. कुठल्याही प्रकारचे क्लासेस त्यांनी लावले नाही. स्वबळावर नियमित अभ्यास, कठोर सराव, नियोजन या त्री सूत्रीच्या मदतीने आज त्यांनी हे यश संपादन केले आहे. यापूर्वी त्याने स्वबळावर विविध स्पर्धा परीक्षाचा यशस्वी सामना केला. वैभव भुतेकर यांची २०२१ मध्ये कर सहाय्यक पदी निवड झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये मंत्रालय लिपिक, अदिवासी आश्रमशाळेवर गृहपाल आणि २०२३ मध्ये त्यांची जालना जिल्ह्यातील वालसा खालसा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक या पदावर निवड झाली होती. सध्या ते वालसा खालसा येथील शाळेवर कार्यरत आहे.