भारत इंग्लंडविरुद्ध 2017चा हिशोब फेडण्यासाठी सज्ज

2017 च्या फायनलिस्ट संघांचा म्हणजेच भारत आणि इंग्लंडचा पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. यावेळी रंगभूमी आहे इंदोरच्या होळकर स्टेडियमची, आणि दिवस आहे रविवारचा. या विश्वचषकातील हा दोन्ही संघांसाठी पाचवा सामना आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

लॉर्ड्सवरील त्या हृदयद्रावक नऊ धावांच्या पराभवाच्या आठवणी आजही प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात ताज्या आहेत. गंमत म्हणजे, त्या विश्वचषकाच्या साखळी सामन्यात भारताने इंग्लंडवर मात केली होती, पण अंतिम लढतीत यजमानांनी बाजी मारली.

तो 2017चा विश्वचषक भारतीय महिला क्रिकेटसाठी खरोखरच एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरला. त्यानंतर देशात महिला क्रिकेटची क्रांतीच झाली – अधिक सामने, समान मॅच फी आणि माध्यमांमधून वाढलेली प्रसिद्धी. भारताने त्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले नाही, पण एक अब्ज भारतीयांची मने जिंकली आणि देशाला दाखवून दिले की, महिला क्रिकेटही जगावर राज्य करू शकते.

2025 मध्ये चित्र बदलले आहे. यावेळी भारत स्वतः विश्वचषकाचे सहआयोजन करत आहे. याच जुलैमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा करून ऐतिहासिक एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, तर नवोदित क्रांती गौडने केवळ दुसऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक बळी घेऊन लक्ष वेधून घेतले. निर्णायक सामन्यात तिने तब्बल सहा विकेट्स घेत इंग्लंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.

भारताच्या या विजयानंतर कौतुक तर झालेच, पण हेही लक्षात ठेवावे लागेल की त्या मालिकेत इंग्लंडकडे त्यांची माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू हेदर नाइट नव्हती. ती असती तर निकाल वेगळा लागला असता का? कदाचित हो, कदाचित नाही.

या विश्वचषकात नाइटने बांगलादेशविरुद्ध इंग्लंडला रोमांचक विजय मिळवून देत  पुन्हा एकदा तिचा दर्जा दाखवला आहे. 34 वर्षीय नाइटला प्रचंड अनुभव आहे आणि दबावाच्या क्षणी विश्वचषकासारख्या स्पर्धेत कसे खेळायचे हे ती जाणते.

त्याचबरोबर इंग्लंडची सध्याची कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट ही एक खऱ्या अर्थाने ‘मॅच विनर’ आहे. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, ती दोन्ही विभागात कमाल करू शकते. तसेच, 6 फूट उंच अशी डावखुरी फिरकीपटू सोफी एक्लस्टन, जी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकाची गोलंदाज आहे, भारतासाठी पुन्हा एक मोठे आव्हान ठरेल.

भारताला जर इंग्लंडवर मात करायची असेल तर सिव्हर-ब्रंट आणि नाइटला लवकर तंबूत पाठवावे लागेल आणि एक्लस्टनविरुद्ध संयमी खेळी करावी लागेल.

घरच्या मैदानावर भारताने इंग्लंडवर कायम वर्चस्व राखले आहे. पण इंग्लंडच्या चार वेळच्या विश्वविजेत्या संघाने या विश्वचषकात अजूनपर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर भारत सलग दोन सामन्यांत पराभूत झाला आहे. त्यामुळे इंदोरमधील हा सामना रविवारी ‘ब्लॉकबस्टर’ ठरणार यात शंका नाही!

 

आमने-सामने
एकूण: भारत – 36, इंग्लंड – 41
भारतात: भारत – 21, इंग्लंड – 10
विश्वचषकात: भारत – 4, इंग्लंड – 8
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: भारत – 3, इंग्लंड – 2

 

भारत आपला प्लेइंग XI बदलणार का?

या विश्वचषकात भारताने आतापर्यंतच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये एकसारखा प्लेइंग XI निवडला. सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज घेऊन भारताने सामने खेळले. श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध भारत अडचणीत नाही सापडला, मात्र दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सहावा गोलंदाज नसल्यामुळे, पराभव पत्करावा लागला.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात, भारत, रेनुका सिंग ठाकूर, जिने पाकिस्तानविरुद्ध कमाल कामगिरी केली, किंवा अरुंधती रेड्डी, या दोन वेगवान गोलंदाजांपैकी एकाला हरलीन देओल किंवा जेमीमा रोड्रिग्ज ऐवजी संधी देऊ शकतो. डावखुरी फिरकीपटू राधा यादव देखील एक चांगला पर्याय असू शकतो विशेषतः इंग्लंडविरुद्ध, ज्यांच्या संघात (नंबर 11ची फलंदाज लिंसी स्मिथ सोडल्यास) सारे उजव्या हाताचे फलंदाज आहेत.

दुसरी शक्यता म्हणजे अमनजोत कौर, जिने खरंतर काहीही चुकीचं केलेलं नाही, पण कोणत्याही सामन्यात तिचे पूर्ण 10 षटके फेकलेले नाहीत, त्यामुळे तिला बाहेर ठेवता येऊ शकते.

किमान एक बदल अपेक्षित आहे. आणि जर बदल झाले नाही, तर ते खरोखरच आश्चर्यजनक ठरेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 19 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार