कल्याण तालुक्यातील ३०६७ शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महसूल कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पावसामुळे भात पिकांची हानी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाकडून युद्धपातळीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४० तलाठ्यांसह ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी असे ९० अधिकारी-कर्मचारी यांनी अवघ्या १२ दिवसांत तालुक्यातील एकूण ३,०६७ शेतकऱ्यांचे पंचनामे केले.

८७५ हेक्टर भात पिकांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे आणि याद्या तयार झाल्या असून शासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.