उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षीचा अठरा हजार रुपयांचा दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी जाहीर केला असून, कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनपा आयुक्तांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे. मनपाच्या तिजोरीवर आर्थिक ताण असला तरी कर्मचाऱ्यांच्या शहरी सेवेमधील योगदानाची दखल घेत आयुक्त आव्हाळे यांनी बोनस मंजूर केला आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सांगितले की, शहराच्या स्वच्छतेपासून ते प्रशासकीय कामकाजापर्यंत मनपा कर्मचारी सातत्याने आपले कर्तव्य बजावत आहेत. सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबीयांना आनंद फुलवण्यासाठी व त्यांच्या परिश्रमाची दखल घेण्यासाठी हा बोनस देण्यात आला आहे.
१८ हजारांचा बोनस हा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असून, त्यामुळे त्यांना दिवाळीपूर्वी खरेदी आणि इतर खर्चासाठी मोठी मदत मिळेल. मनपातील स्थायी व कंत्राटी दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयासाठी मनपा कर्मचारी संघटनांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत. विशेषतः लेंबर फ्रंटचे युनियनचे अध्यक्ष दीपक दाबणे, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष दिलीप थोरात, भारतीय कामगार काँग्रेस युनियनचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी आयुक्त आव्हाळे यांचे अभिनंदन केले आहे.
मनपाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असला तरी, कर्मचाऱ्यांचे मनोबल टिकवण्यासाठी आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय आवश्यक होता, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.