या विश्वचषकात कोलंबोने आतापर्यंत ‘विकट नायकाची’ भूमिका बजावली आहे. येथे झालेल्या सात सामन्यांपैकी तीन सामने पावसामुळे रद्द झाले. एका सामन्यात तर एकही चेंडूचा खेळ झाला नाही, तर उर्वरित दोन सामने अनुक्रमे पहिल्या डावानंतर आणि दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच थांबवावे लागले.
बुधवारी पाकिस्तानला निसर्गाच्या या लहरी स्वभावाचा फटका बसला. चार वेळा विश्वविजेते ठरलेल्या इंग्लंडला केवळ 31 षटकांत 133 धावांवर रोखून पाकिस्तानने अप्रतिम कामगिरी केली. धावांचा पाठलागही सकारात्मक पद्धतीने सुरू झाला होता आणि पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध पहिल्या विजयाच्या मार्गावर होता. पण अखेरीस पावसाने पुन्हा खेळ बिघडवला आणि सामना रद्द करण्यात आला.
मंगळवारीही अशीच कहाणी पाहायला मिळाली. श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकांत 258 धावा फटकावून सामन्यावर भक्कम पकड मिळवली होती. ‘व्हाइट फर्न्स’ला नमवण्याची संधी त्यांच्या समोर होती, पण पावसाने पुन्हा एकदा या विश्वचषकाच्या सह-आयोजकांवर दया दाखवली नाही. संपूर्ण दुसऱ्या डावावर अक्षरशः पाणी फेरले गेले.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी, श्रीलंका पुन्हा कोलंबोच्या मैदानात उतरणार आहे. यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. उपांत्य फेरीची शर्यत अधिकच रंगतदार झाल्याने, दोन्ही संघ नेटाने सराव करत असतील. मात्र, खेळाडू सरावाबरोबरच थोडा वेळ प्रार्थनेतही घालवत असतील, असं वाटतं. फक्त पावसाने थोडी विश्रांती घ्यावी, एवढीच त्यांची प्रार्थना असेल.
गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका खूपच चांगल्या स्थितीत आहे. त्यांनी चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. लॉरा वुलव्हार्टच्या नेतृत्वाखालील या संघाने काही चुरशीच्या लढतीत विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, भारतासोबत पहिल्यांदाच विश्वचषकाचे आयोजन करणारे श्रीलंका अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या खात्यात दोन गुण जरूर आहेत, पण ते पावसामुळे रद्द झालेल्या सामन्यांमुळे मिळालेले आहेत.
जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला, तर त्यांच्या ‘टॉप फोर’मध्ये पोहोचण्याच्या आशा आणखी बळकट होतील. पण श्रीलंकेचा पराभव झाला, तर त्यांच्या विश्वचषकाच्या आशांना पूर्ण विराम लागेल. मात्र, श्रीलंकेचा विजय हा या स्पर्धेला अधिक रोमहर्षक बनवू शकेल.
तर मग, वरुण देव शुक्रवारी सुट्टी घेईल का, ज्यामुळे क्रिकेटप्रेमी पावसा ऐवजी, खेळाच्या आनंदात चिंब भिजतील? पाहूया, काय घडतं!
आमने-सामने
एकूण: श्रीलंका – 6, दक्षिण आफ्रिका – 16
विश्वचषकात: श्रीलंका – 2, दक्षिण आफ्रिका – 4
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: श्रीलंका – 6, दक्षिण आफ्रिका – 4
संघ
श्रीलंका: चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, विश्मी गुणरत्ने, हर्षीथा समरविक्रमा, कवीषा दिल्हारी, निलाक्षिका सिल्वा, अनुश्का संजीवनी (उपकर्णधार, यष्टीरक्षक), इमेशा दुलानी, देवमी विहंगा, पिउमी वत्सला, इनोका रणवीरा, सुगंदिका दसनायक, उदेशिका प्रबोधनी, माल्की मदार, अचिनी कुलसूरिया
दक्षिण आफ्रिका: लॉरा वुलव्हार्ट (कर्णधार), आयाबोंगा खाका, क्लोई ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, मारिझान काप, ताझमिन ब्रिट्स, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), नॉनकुलुलेको म्लाबा, अॅनरी डर्क्सन, अॅनेक बौश, मासाबाता क्लास, सुने लिस, कराबो मेसो (यष्टीरक्षक), तुमि सेखुखुने, नोंडुमिसो शांगासे
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
नादिन डी क्लर्क: मागील दोन सामन्यांमध्ये या 25 वर्षांच्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने अप्रतिम परिपक्वता दाखवत आपल्या संघाला संकटातून बाहेर काढले आणि आव्हानात्मक धावसंघर्षात धीर न सोडता विजय मिळवून दिला.
क्लोई ट्रायॉन: या अनुभवी दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूने स्पर्धेत आतापर्यंत काही विजयी खेळी खेळल्या असून गोलंदाजीमधूनही महत्त्वाचे योगदान दिले आहे.
निलाक्षिका सिल्वा: उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने झुंजार अर्धशतक झळकावत जवळपास 200च्या स्ट्राइक रेटने खेळ केली. तिच्या दमदार कामगिरीमुळे श्रीलंकेनं न्यूझीलंडविरुद्ध भक्कम धावसंख्या उभारली. श्रीलंकेकडे या स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्याची सुवर्ण संधी होतो मात्र तो सामना अखेरीस पावसामुळे रद्द झाला.
इनोक रणवीरा: श्रीलंकेची डावखुरी फिरकी गोलंदाज आतापर्यंतच्या विश्वचषकात प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली आहे. मधल्या षटकांमध्ये धावांचा प्रवाह रोखत विकेट्स घेण्याची तिची क्षमता जबरदस्त आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 17 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क , जिओहॉटस्टार