मतदारांसह जागा वाढल्याने सर्वपक्षियांनी कंबर कसली
ठाणे: झपाट्याने लोकसंख्या वाढत असलेल्या दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील प्रभाग रचनेवरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपातच जुंपण्याची शक्यता आहे. या प्रभागात दोन सदस्य वाढल्याने सर्वच पक्षांनी त्या भागाकडे लक्ष केंद्रित केले आहे.
दिवा प्रभाग समितीमध्ये प्रभाग क्र, २७, २८ आणि २९ हे प्रभाग मोडतात, शीळ, म्हातार्डी, आगासन, खर्डी, नवीन शिबली नगर, वाय जंक्शन, डवले, साबे, पडले संग्राली, डायघर, कौसा तलाव, सोनखर, डोमखर, बेतावडे, दातीवली, बी आर. नगर, बेडेकर नगर या भागाचा समावेश आहे. अतिशय मोठ्या भौगोलिक रचना या प्रभागाच्या असून ग्रामिण आणि शहरी अशी ही प्रभाग समिती आहे. या प्रभाग समितीमध्ये दिवा पंचक्रोशीत एकत्रित शिवसेना असताना येथे सेनेची सत्ता होती. सहा सदस्य सेनेचे विजयी झाले होते, परंतु शिवसेना फुटल्यानंतर येथे उबाठा, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. त्यामुळेच प्रभाग रचना सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी केली असल्याचा आरोप करून शंभरपेक्षा जास्त हरकती या भागातून आल्या होत्या. त्यामध्ये भाजपाच्या हरकती जास्त होत्या. आगामी निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि उबाठा यांच्यात या भागात लढत होण्याची शक्यता आहे. हा भाग कल्याण ग्रामिण विधानसभा मतदारसंघात मोडतो. या भागाचे नेतृत्व शिंदे गटाचे राजेश मोरे हे करत आहेत तर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा बालेकिल्ला आहे. त्यांना या भागातून सर्वाधिक मतदान झाले होते, त्यामुळे शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीची महायुती झाली तरी सेना या भागातील आपल्या हक्काच्या जागा भाजपाला सोडणार नाही, त्यामुळे या भागात शिवसेना आणि भाजपा आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे.
दिवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आहेत. या भागातील नागरिकांना, पाणी, आरोग्य, चांगले रस्ते, शाळा या नागरी सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. हा मुद्दा आगामी महापालिका निवडणुकीत गाजणार आहे. सत्ताधारी पक्षाने देखिल सुविधा पुरवल्या असून या भागातील डम्पिंग ग्राउंड हटवून दिवेकरांची दुर्गंधीतून मुक्तता केली आहे. वाढलेले मतदार आणि वाढलेल्या दोन जागा काबीज करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी कंबर कसली असून निवडणूक जाहीर झाल्यानंतर या भागातील मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतात, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.