पाटोळे यांचा जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार

ठाणे: न्यायालयीन कोठडीत असलेले ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांचा जामीन अर्ज अखेर ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस.शिंदे यांनी आज फेटाळला आहे.

जामीन अर्ज फेटाळल्याने पाटोळे यांच्यासह ओमकार गायकर, सुशांत सुर्वे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे लाचखोर पाटोळेंसह ओमकार गायकर आणि सुशांत सूर्वे यांना यंदाची दिवाळी तळोजा कारागृहात साजरी करावी लागणार आहे. दरम्यान, पाटोळे यांचे वकील जामीनसाठी आता उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असून या तिघांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

नौपाड्याच्या एका खासगी जागेतील अतिक्रमण हटविण्यासाठी बिल्डरकडून ५० लाखांच्या लाचेची मागणी करीत २५ लाखांची लाच स्विकारल्याप्रकरणी मुंबई एसीबीने पाटोळे यांना पालिकेच्या वर्धापनदिनी अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा संपूर्ण तपास ठाणे लाचलुचपत विभागाकडे वर्ग करण्यात आला. सोमवारी न्यायालयाने पाटोळे, गायकर आणि सुर्वे या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुधवारी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.शिंदे सुट्टीवर असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. गुरूवारी सुनावणी दरम्यान हे मनी लॉण्डरींगचे प्रकरण आहे का? असा प्रश्न पाटोळे लाच प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला विचारला. त्यावर स्पष्टीकरण देताना त्या अधिकाऱ्याला इन्व्हेस्टीगेशन शब्दच उच्चारता आला नाही. त्यामुळे तपास अधिकाऱ्याला न्यायमुर्ती शिंदे यांनी चांगलेच फैलावर घेतले होते. तर आज जामीनावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने तपासावर नाराजी व्यक्त करून पाटोळे आणि इतर दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. दरम्यान, ठाणे न्यायालयाने तपासासंदर्भात ठाणे एसीबीवर पुन्हा नाराजी व्यक्त केली.