नवी दिल्ली: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार होती. मात्र आजची ही सुनावणी १ महिना पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १२ नोव्हेंबरला होणार आहे.
न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हा खटला सुनावणीसाठी येणार होता. परंतु सशस्त्र दलाच्या महत्त्वाच्या सुनावणीमुळे न्या. सूर्यकांत यांना आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुरेसा वेळ मिळणार नव्हता. त्यामुळे आज न्यायाधीशांसमोर उद्धव ठाकरे यांच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा हवाला देत नजीकची तारीख देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून डिसेंबरमधील तारीख देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही बाजूचे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी १२ नोव्हेंबरची तारीख दिली. या खटल्यावर १२ नोव्हेंबरला सुनावणी करूया असं कोर्टाने म्हटलं.
आजच्या सुनावणीत कोर्टाने कपिल सिब्बल यांना अंतिम युक्तिवाद करण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागेल असं विचारले असता मला ४५ मिनिटे पुरेशी आहेत असं सिब्बल यांनी उत्तर दिले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज अंतिम सुनावणी होऊन निकाल हाती लागेल असं अपेक्षित होते परंतु सशस्त्र दलाशी निगडीत महत्त्वाचा खटला कोर्टासमोर आहे. यावर सविस्तर सुनावणी कोर्ट घेणार आहे. त्यामुळे शिवसेनेची संबंधित याचिका पुढे ढकलण्यात आली आहे.