जिल्ह्यातील उद्योगाला वीज, पाणी वाहतूक कोंडीचे आव्हान

उद्योग संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांपुढे वाचला पाढा

ठाणे: वांरवार खंडीत होणारा वीजपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आदी समस्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रापुढे आव्हान उभे राहिले असून पायाभूत सुविधांचे जाळे उभारण्यास प्राधान्य देण्याची मागणी जिल्ह्यातील उद्योजकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्या आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता विजय फुंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजेच टीसाने यावेळी पाणी व कचरा डेपोकडे लक्ष वेधले. पाण्याचा शटडाउन घेताना आगाऊ सुचना दिली जात नाही. अचानक पाणी कपात केली जात असल्यामुळे नुकसान सहन करावे लागते, असे यावेळी सांगण्यात आले. तसेच वागळे इस्टेटमधील रस्ता क्र. २६ वर कचरा टाकण्यास त्वरित आळा घालावा. यामुळे कामगारांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून, परदेशी पाहुण्यांसमोर उद्योगांची प्रतिमा खराब होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याशिवाय एपीएफओ कार्यालयात येणार्‍या अडचणींकडेही लक्ष वेधण्यात आले.

अंबरनाथमध्ये एमआयडीसीने भूखंड वाटप करताना अनेक ठिकाणी योग्य पायाभूत सुविधा दिल्या नसल्याचे ‘आमा’ संघटनेने निदर्शनास आणून दिले. अजूनही अंतर्गत रस्ते आणि वादळी पाण्याचा निचरा करणारी गटार व्यवस्था अपूर्ण आहे. गेल्या एक वर्षापासून नियमितपणे एक ते दोन तासांसाठी वीज खंडित होत असल्याने उद्योगांचे मोठे नुकसान होत आहे. कटाई नाका ते बदलापूर एमआयडीसीपर्यंतच्या रस्त्याचे काम योग्य न झाल्याने कोंडीचा त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली.

शहापूर इंडस्ट्रियल असोसिएशननेही अनियमित वीजपुरवठ्याची समस्या मांडली. विशेष म्हणजे तानसा आणि भातसा धरणातून पाणी मिळूनही उद्योगांसाठी पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी नसल्याने टँकरवर अवलंबून रहावे लागत असल्याचे सांगितले. शहापूर तालुक्यात सुमारे २५०० ते ३००० उद्योग असून, येथे पूर्ण क्षमतेचे अग्निशमन केंद्र तातडीने उभारण्याची मागणी करण्यात आली.

मुरबाड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने वारंवार खंडीत होणार्‍या वीज पुरवठ्याकडे यावेळी लक्ष वेधले. जुन्या आणि कमकुवत व्यवस्थेमुळे मुरबाडमध्ये दररोज वीजपुरवठा खंडित असून पूर्ववत होण्यास बराच वेळ लागतो. त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. एकतर खासगी कंपनीला वीज पुरवठा करण्यासाठी परवानगी द्यावी किंवा वाहिन्या भूमिगत कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. एमआयडीसीमधील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून ते रुंद आणि आरसीसी करण्याची सुचना करण्यात आली. तसेच वाढत्या औद्योगिक आणि निर्यात उपक्रमांमुळे कंटेनर ट्रक रस्त्यांवर उभे राहतात. ज्यामुळे वाहतूक कोंडी होते. या समस्येवर तोडगा म्हणून एमआयडीसी क्षेत्रात एक स्वतंत्र ट्रक टर्मिनस तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.