* महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याच्या हालचाली
* समस्यांविरुद्ध आंदोलन उभारण्यासाठी बैठक घेतल्याचा खुलासा
ठाणे: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला टक्कर देण्याकरीता मनसे आणि महाविकास आघाडीच्या ठाण्यातील नेत्यांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले असून ठाण्यामध्येही मोठी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ठाण्यातील ‘नाद’ या निवासस्थानी नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमुळे महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचाली दिसून येत आहेत.
या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली,” असे त्यांनी म्हटले असले तरी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक निवडणूक एकत्र लढवण्याच्या तयारीची पहिली पायरी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या समाज माध्यमांवरील बैठकीच्या पोस्टमुळे महायुतीविरोधात ठाण्यात मनसे आणि मविआ एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, युतीचा हा ‘शुभांरभ’ ठाण्यातून होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
ठाणे शहरातील समस्या ट्रॅफिक, डम्पिंग, पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, सेवा रस्ता, मेट्रो, अनधिकृत फेरीवाले आणि ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत असल्याचे दिसत आहे. याबाबत मनसेचे अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ठाणे महापालिकेत वाढलेला भ्रष्टाचार आणि पाणी प्रश्नावर आम्ही चर्चा केली असून या प्रश्नावर जनआंदोलन उभारण्याचा आमचा निश्चय झाला आहे. निवडणूक एकत्रित लढवायची किंवा स्वतंत्रपणे लढवायची याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे हे घेतील, असे देखिल श्री.जाधव यांनी स्पष्ट केले.