मुरबे बंदर प्रकल्प: मच्छीमारांचा आज मोर्चा
ठाणे: पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे मोठ्या प्रमाणावर ‘सिल्वर पापलेट’सह अन्य प्रजातीचे मासे सापडतात. मात्र, प्रस्तावित मुरबे मल्टी-कार्गो पोर्ट या प्रकल्पामुळे मुरबे, सातपाटी, उच्चेळी, दांडी, नवापूर, नांदगाव, वडराई, केळवे-माहीम, केळवे, दातिवरे, कोरे आणि एडवण परिसरातील मासेमारी व्यवसायावर परिणाम होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित मुरबे मल्टी-कार्गो पोर्ट प्रकल्प अपूर्ण आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खोट्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाच्या (ड्रफ्ट ईआयए) अहवालावर पुढे नेण्यात येत असल्याचा आरोप मच्छीमार संघटनेने केला आहे. तसेच, या प्रकल्पामुळे मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम होण्याची भीती मच्छीमारांनी व्यक्त केली असून या प्रकल्पाला आता विरोध होऊ लागला आहे. दरम्यान, येत्या ६ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांच्या अध्यक्षतेखाली होणारी जनसुनावणी जनतेची फसवणूक असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे. ही जनसुनावणी पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी शनिवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
जनसुनावणी पुढे ढकलण्याबाबत वारंवार मागणी करूनही जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त मच्छीमारांनी त्याविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाबाहेर शनिवारी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांनी याबाबत मच्छीमारांशी तातडीने चर्चा करावी, अशीही मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.