पावसामुळे फुलांची आवक घटली

किमती वाढल्या, दसरा महागला

ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तानिमित्ताने फूल बाजारात नागरिक गर्दी करत आहेत. पावसामुळे फुलांची आवक घटल्याने त्यांचे दरही चढले आहेत, त्यामुळे यंदाचा दसरा महागण्याची चिन्हे आहेत.

ठाण्यातील स्टेशन परिसर, जांभळी नाका आणि मुख्य बाजारपेठ फुलांनी व आपट्याच्या हिरव्या पानांनी (सोन्याने) सजली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे आवक कमी झाली असून फुलांच्या किमती वाढल्या आहेत, तरीही खरेदी-विक्री सुरू असून बाजारात मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल होत असल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात पिवळा, भगवा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत होती. ८० ते १५० रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत आहे. देवीच्या पूजेसाठी वापरली जाणारी शेवंती १०० ते २०० रुपये किलो आहे. यासह अस्टर, मोगरा, जाई, जुई, चाफा, गुलछडी, गुलाब, सोनचाफा, जरभरा या फुलांचा बाजार सुरू आहे. वेणी, गजरा बनविण्यासाठी मोगरा, जाई, जुई फुले खरेदी केली जात आहे. यासह झेंडूच्या फुलांचा एक मीटर हार १०० रुपये, तोरण ५० ते १०० रुपये, पूजेसाठी लागणारे बेल पान, तुळस, दुर्वा १० ते २० रुपये जुडीप्रमाणे विकले जात आहे.

दसऱ्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून वाडा, येऊर, भिवंडी, कर्जत, पानखंड आदी भागातील आदिवासी फूल विक्रेते मोठ्या संख्येने ठाण्याच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. दरम्यान आदिवासी फूल विक्रेत्यांनी दसऱ्याला लागणारे नवसवाचे तोरण, भाताच्या लाह्या, आंब्याच्या टाळा, आपट्याच्या पानांची जोडी, जांभळी फुले, करडू, आदी अश्या विविध वस्तू दोन ते तीन दिवस जंगलात फिरून गोळा केल्या आहेत. तसेच या सर्व वस्तू घेऊन विक्रीसाठी ठाण्यात दाखल झाले असून या दसऱ्याला लागणाऱ्या वस्तूंमुळे त्यांना उदरनिर्वासाठी यामधून काही पैसे कमवता येतात. मात्र मुसळधार पावसाने महागाई वाढत असून त्याचा परिणाम विक्रीवर होत असल्याचे आदिवासी विक्रेत्यांनी सांगितले.

* पिवळा झेंडू: 70 रु.अर्धा किलो
* भगवा झेंडू: 70 रु.अर्धा किलो
* आपट्याची पाने: 10 ते 20 रु.जुडी
* करडू फुले: 10 ते 20 रु. जुडी
* आंब्याचे पाने: 20 ते 30 रु.जुडी
* भाताच्या लाह्या: 10 ते 20 रु. जुडी
* गुलाब: 200 रु. जुडी
* कमळ: 20 रु.नग
* पिवळा अष्टर: 80 ते 100 रु. अर्धा किलो
* जांभळी अष्टर: 100 रु. अर्धा किलो
* गजरा: 20 रु. नग
* वेणी: 40 रु. नग
• गुलाब: 100 रु. किलो
* नामधारी गोंडा: 80 अर्धा किलो
* फुलांचा हार: 80 ते 200 रु.
* पिवळी शेवंती: 100 ते 200 किलो
* पांढरी शेवंती: 100 ते 200 रु. किलो
* ऑर्किड: 30 ते 40 रु. एक काडी

पावसामुळे फुलांची आवक कमी झाली असून काही ठिकाणी माल खराब होत आहे. बाजारात दरवर्षी झेंडू फुलांची आवक जास्त प्रमाणात होत असते, मात्र पावसामुळे या फुलांचे नुकसान झाले असून यामुळे बाजारात आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वीस ते पन्नास टक्क्यांची वाढ झाली असल्याचे फुल विक्रेत्या मनीषा पाटील यांनी सांगितले.