ठाणे: कळवा येथील राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहर युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांना शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसला खिंडार पडल्याने राष्ट्रवादी नेते आ.डॉ. आव्हाड यांना हा मोठा झटका मानला जात आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत श्री. खामकर आणि मनसेचे पिटर डिसोजा यांनी प्रवेश केला. यावेळी मनसे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या समाजसेवेच्या कार्याने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे या तरुण कार्यकर्त्यांनी सांगितले.
शिंदे गटाने दोन महिन्यांपूर्वी कळवा प्रभाग समितीमधील आ. आव्हाड यांच्या प्रमुख शिलेदारांना फोडून झटका दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक लहान-मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शिवसेनेत घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाला हादरे दिले. त्यापाठोपाठ आज आ. आव्हाड यांचे खंदे समर्थक विक्रम खामकर गळाला लागल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाला मोठा झटका बसला आहे.
यावेळी मनसेचा पिटर डिसोझा हा मोहरा देखिल शिंदे गटाने टिपल्याने मनसेला देखिल फटका बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने इतर पक्षांना देखील धक्के देण्याचे काम सुरु केले असून आणखी मोठे मासे आमच्या गळाला लागले आहेत, ते पुढील काळात तुम्हाला समजेल असे शिवसेनेच्या एका नेत्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.