भातसाच्या इतिहासात प्रथमच चार मिटरने उघडले पाच दरवाजे

शहापूर: ठाणे आणि पालघरमध्ये पावसाने हाहाकार उडवला असून यावर्षी भातसाच्या इतिहासात प्रथमच तब्ब्ल चार मिटरने पाचही दरवाजे उघडले गेले आहेत.

शहापूर तालुक्यातील मुंबई आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणारे भातसा हे एक महत्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. या धरणाचे कामकाज १९६९ मध्ये सुरु करण्यात आले. दरम्यान या धरणाच्या निर्मितीपासून कितीही पाऊस पडला तरी या धरणाचे पाचही दरवाजे दोन ते अडीच मीटरच्या वर कधी उघडले नव्हते. यंदा मात्र पाचही दरवाजे चार मीटरने उघडले गेले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणारी तीनही धरणे सध्या काठोकाठ भरली असून एकूण साठा ९९.४० टक्के इतका झाला आहे. मागील २४ तासांत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची विक्रमी नोंद झाली असून यामुळे आगामी काळात मुंबईकरांना पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धरणाची एकूण पाणीपातळी १४२ मीटर इतकी असून यामध्ये आतापर्यंत ९९.३६ टक्के इतका पाणीसाठा आहे. दरम्यान भातसा धरणाचे दरवाजे चार मिटरने उघडले असून यामधून ६६ हजारपेक्षा जास्त क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तथापि तानसा, भातसा, वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठी असलेल्या अनेक गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहापूर तालुक्यात परतीचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.