अंबरनाथ भाजपचे आंदोलन तूर्त स्थगित
अंबरनाथ: शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक तीन आठवड्यांत करण्याचे लेखी आश्वासन अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने दिल्यानंतर भाजपाने नगरपालिकेला टाळे ठोकण्याचे नियोजित आंदोलन तूर्त स्थगित केले आहे.
अंबरनाथ शहरातील बंद पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, कचरा समस्या आदी मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. चुकीच्या पद्धतीने झालेले रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण यामुळे रात्रीच्या वेळी निर्माण झालेली गुन्हेगारी समस्या, वाढते अपघात याकडे भारतीय जनता पक्षातर्फे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील यांनी नगरपालिकेच्या अनागोंदी आणि गैरकारभाराविरोधात पत्रकार परिषदेत शुक्रवारी ( 25 ) रोजी नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता.
भाजपाने दिलेल्या इशाऱ्याची दखल घेऊन मुख्याधिकारी गायकवाड यांनी चर्चा करण्यास बोलावून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. उप मुख्याधिकारी उमेश राऊत, लक्ष्मण पंत, अजित खरात, संतोष शिंदे, दिलीप कणसे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रशासनाने रस्ता काँक्रीटीकरण कामातील त्रुटी दूर करून नादुरुस्त पथदिवे दुरुस्ती, पदपथ, गटारे यासारखी कामे करण्याबाबत कार्यवाही करण्याचे नियोजन केले आहे. पथदिव्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अपघात आणि सुरक्षितता याबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत, या सर्व उपाययोजना कार्यवाहीसाठी तीन आठवड्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्याची माहिती श्री.करंजुले-पाटील यांनी दिली. त्यामुळे शुक्रवार 25 सप्टेंबर रोजी नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन तूर्त स्थगित केल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व नागरी सुविधांच्या कामाची मागण्यांची आगामी तीन आठवड्यांत सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अभिजीत करंजुले यांनी दिली. मुख्याधिकारी गायकवाड यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तूर्त स्थगित केल्याचे ते म्हणाले.