ठाणे: बाळकूम भागातील अनधिकृत इमारतींच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचा बडगा उगारताच ठाणे महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागली. त्यामुळे या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत.
शीळ भागातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा न्यायालयाने अनधिकृत बांधकामांची गंभीर दखल घेतल्याने महापालिका प्रशासन देखिल कामाला लागले. मात्र माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालयाजवळ असलेल्या साईदर्शन कॉम्प्लेक्सच्या तीन विंग आणि आराध्यम वेज रेस्टॉरंटविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही कारवाई न झाल्याने न्यायालयाने पुढील १५ दिवसांत या इमारतींचा पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश २२ सप्टेंबर रोजी दिले होते. काल महापालिकेचे विधी सल्लागार मकरंद काळे यांनी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करावी. काही अडचण आली तर विधी विभागाशी संपर्क साधावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे. त्यामुळे या तीन इमारती आणि रेस्टॉरंटच्या विरोधात महापालिका प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणणाले आहेत.