ठाणे: श्री जय अंबे माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे ४८ वे वर्ष आहे. यंदा दुर्गदुर्गेश्वरी नवरात्रोत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामीळनाडु येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. उत्तर आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा हा भव्य देखावा असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
यावर्षीच्या सजावटीची लांबी ११० फूट आहे, तर रुंदी मागच्या बाजूला ४५ फूट आणि पुढच्या बाजूला ५५ फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारण ७५ फुटांपर्यंत पोहोचेल. या देखाव्यासाठी एकूण १२५ (सव्वाशे) खांब वापरले असून, प्रत्यक्षात २६ खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत. या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची २९ फूट असून, ते एकाच ग्रॅनाइटच्या दगडापासून बनले आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत, असे म्हटले जाते. या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे. बृहदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आलेला नाही. त्याऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले, ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले अशा साऱ्यांसाठी श्री दुर्गेश्वरीच्या चरणी प्रार्थना, नवस किंवा गाऱ्हाणे मांडण्यात येणार आहे. मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चारधाम मंदिरांची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचे काम सुरु आहे.
प्रवेशद्वारावर २४ बाय २९ फुटाची भगवान शंकराची मूर्ती उभारण्यात आली असून ती २९ फुटी बृहदेश्वर मंदीराच्या शिवलिंगाचे समानत्व साध्य करते. तिच्या आसपास चारधाम देवालये उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा देखावा तयार करण्याचे काम मागील अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. सध्या जागेवर १२५-१५० लोक आणि बाहेर कास्टिंगसाठी मोल्डिंग, डिझानिंग असे मिळून एकूण २००-२५० कलाकार दिवसरात्र काम करत आहेत. गणपती विसर्जनानंतर वाहतुकीची अडचण लक्षात घेता, केवळ १३ दिवसांत हा देखावा पूर्ण करण्यात येणार आहे.
खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उत्सव यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत.