भारतात आणि श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषकाला अवघे दोन आठवडे बाकी असताना भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येणार आहेत. पहिला आणि दुसरा सामना 14 व 17 सप्टेंबर रोजी न्यू चंदीगड येथे खेळवला जाईल, तर तिसरा आणि शेवटचा सामना 20 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे होणार आहे.
आमने-सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत 56 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 10 सामने जिंकले आहेत तर ऑस्ट्रेलियाने 46. भारतात झालेल्या लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलिया 20-4 अशा फरकाने आघाडीवर आहे.
संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), स्नेह राणा
ऑस्ट्रेलिया: अॅलिसा हीली (कर्णधार), ताहलिया मॅक्ग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, निकोल फाल्टम, अॅश्ले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, चार्ली नॉट, फीबी लिचफिल्ड, सोफी मोलिन्यू, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलंड, जॉर्जिया वोल, जॉर्जिया वेअरहॅम.
कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल
हरमनप्रीत कौर: भारतीय कर्णधार नुकत्याच संपन्न झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या यशस्वी एकदिवसीय मालिकेत चमकली. तिने तीन सामन्यांत 126 धावा ठोकल्या, ज्यात एका शतकीय खेळीचा समावेश होता. तिच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 36 वर्षीय हरमनप्रीत तिचा 150 वा एकदिवसीय सामना खेळण्यास सज्ज आहे.
दीप्ती शर्मा: आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा चौथ्या स्थानावर आहे. 109 एकदिवसीय सामन्यांत तिने 2392 धावा केल्या आहेत. तिच्या अचूक ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जोरावर तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 136 विकेट्स पटकावल्या आहेत.
अॅलिसा हीली: ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचे भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये आकडे शानदार आहेत. 16 सामन्यांत तिने 42च्या सरासरीने 544 धावा रचल्या आहेत. तिने भारताविरुद्ध तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.
अॅश्ले गार्डनर: उजव्या हाताची फलंदाज आणि ऑफ-स्पिन गोलंदाज असलेली गार्डनर आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. 77 एकदिवसीय सामन्यांत तिने 1200+ धावा केल्या आहेत आणि 100+ विकेट्स घेतल्या आहेत. तिची ‘मॅच विनर’ म्हणून ख्याती आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
दिनांक: 14 सप्टेंबर 2025
वेळ: दुपारी 1:30 वाजता
ठिकाण: महाराजा यादविंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लांपूर, न्यू चंदीगड
प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार