ठाण्यात गाडीने चिरडून हत्या

ठाणे: वागळे इस्टेट येथील आयटीआय सर्कलजवळ गाडीने चिरडून एकाची निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. दोघेही एकाच पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. संतोष पवार उर्फ संद्या असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, परिसरातील आयटीआय सर्कल जवळ, रोड नंबर 27 वर हा प्रकार घडला आहे.

मंगळवारी गौरी गणपतीच्या विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे. यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव विठ्ठल गायकर असल्याचे कळते. त्याचा खून का करण्यात आला, याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही.

संतोष पवार उर्फ संद्या हा नामचीन गुंड असल्याचे कळते. तो एका पक्षाचा कार्यकर्ता होता. मिळालेल्या माहितीनुसार संतोष पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार चालवत होता. याच कारने विठ्ठलला उडवले होते. विठ्ठल जागीच ठार व्हावा यासाठी त्याच्या अंगावरून दोन-तीनवेळा गाडी नेण्यात आली. गाडीने चिरडल्याने विठ्ठलचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला आहे. दुसऱ्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. श्रीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.