दीड कोटींची बनावट विदेशी दारू हस्तगत

ठाणे : गोवा राज्यनिर्मित बनावट दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेत दीड कोटींची विदेशी दारू जप्त केली आहे.

गोवा येथून बनावट दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने खारीगाव टोल नाका येथे सापळा रचला. बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास एक संशयित ट्रक वाहतूक करताना पथकाच्या निदर्शनास आले. त्यांचा संशय बळावल्याने त्यांनी ट्रक अडवून पाहणी केली असता ट्रकमध्ये बनावट विदेशी दारूचे १,४०० बॉक्स मिळाले.

पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शमशाद सलमानी याला अटक करत त्याच्याकडून एक कोटी ५६ लाख ६३,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही दारू त्याने कुठून आणली आणि कोणाला विक्री करण्यासाठी आणली होती याचा तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांनी दिली.