उल्हासनगर : उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका वकील महिलेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
आत्महत्या केलेल्या वकील महिलेचे नाव सरिता खानचंदानी असे आहे. त्या उल्हासनगरातील कॅम्प ४ परिसरातील रोमा अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. त्या हिराली फाउंडेशनच्या अध्यक्ष व एक नावाजलेल्या वकील होत्या. गुरुवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर त्या गेल्या. त्यांनी टेरेसवरील ग्रीलवर बसून सर्वप्रथम आकाशाकडे बघून नमस्कार केला. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणाहून खाली उडी मारली. हा धक्कादायक प्रकार त्या ठिकाणी घडताच या घटनेची खबर विठ्ठलवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्वरित जखमी अवस्थेत पडलेल्या सरिता खानचंदानी यांना जवळच्या बालाजी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्यांना उल्हासनगरातील कॅम्प तीन परिसरातील मॅक्सि मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक झाल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.