कल्याण: कल्याणचा बराचसा भूप्रदेश सखल भागात मोडतो त्यामुळे मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यावर या सखल भागात पाणी साचते. कल्याण पश्चिम येथील सिटी पार्कही याला अपवाद नाही. अतिवृष्टी झाल्यास पुराच्या पाण्यामुळे सिटी पार्कमध्ये चोहीकडे पाणी पसरलेले दिसून येते.
![]()
दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनुसार कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. परिणामी सिटी पार्कमध्ये देखील पाणी साचल्याचे दिसून आले.
तथापि कल्याणमधील नागरिकांच्या विरंगुळ्याचे एक प्रमुख ठिकाण असणाऱ्या या सिटी पार्कमध्ये पाऊस ओसरताच संबंधित विकासकाने रातोरात सुमारे 60 कामगार लावून तेथे साचलेला गाळ, झाडांची पाने, कचरा साफ केला. तेथील विद्युत यंत्रणेची पाहणी करून ती पूर्ववत केली. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यानंतर 12 तासातच सिटी पार्क पुन्हा स्वच्छ, रमणीय आणि बालचमुच्या बागडण्यामुळे, नागरिकांच्या वर्दळीमुळे फुललेले दिसून आले.