* आमदार संजय केळकर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
* आयुक्तांच्या भेटीत तीन मागण्या मान्य
* नवीन भरतीत प्राधान्य देण्याची मागणी
ठाणे : विविध मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. दरम्यान आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर तीन मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच नवीन होणाऱ्या भरतीत अनेक वर्षे काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळावे अशी मागणी केली असून ती पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे श्री.केळकर यांनी आंदोलकांना सांगितले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने अनेक वर्षे सेवा करणाऱ्या कंत्राटी कामगारांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी आज मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. याबाबत श्री.केळकर यांना माहिती मिळताच ते आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आयुक्तांची भेट घेत कंत्राटी कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांचा विमा, किमान वेतन आणि रजा या संबंधित मागण्या मान्य केल्या. त्यानंतर त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना श्री.केळकर म्हणाले, कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत काही अधिकारी झारीतल्या शुक्राचार्यांची भूमिका बजावत आहेत, त्या अधिकाऱ्यांचे पार्सल परत पाठवण्याची वेळ आली आहे. पण या कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही.
तत्पूर्वी श्री.केळकर यांनी आयुक्तांची भेट घेत चर्चा केली. नवीन भरतीत या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यासह अनेक मागण्या मांडल्या. किमान वेतनाचा प्रस्ताव राज्य शासनाने आणला असून तो मंजूर होऊन लवकरच त्याचा अध्यादेश काढावा यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे देखील श्री.केळकर म्हणाले.
महापालिकेत आरोग्य खात्यात करोनाच्या काळात देखील जीवावर उदार होऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली, या कर्मचाऱ्यांसाठी नवीन भरतीत काही जागा राखीव ठेवण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे श्री.केळकर म्हणाले. कामगारांवर अन्याय करणाऱ्या कंत्राटदारांना काळया यादीत टाकण्याची मागणी देखील आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, भाजपा कामगार युनियनचे महेश कदम, दत्ता घुगे, अजित मोरे व आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.