चाकरमान्यांचा उदंड उत्साह एसटीच्या ५१०३ गाड्या फुल्ल

सर्वाधिक गाड्या ठाणे विभागातून

मुंबई: येत्या २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बसगाड्या आतापर्यंत फुल्ल झालेल्या आहेत. सर्वाधिक २६७१ गाड्या ठाणे विभागातून फुल्ल झाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले की, मुंबईतील कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

ठाणे विभागातून गट आरक्षण २३०२, पूर्ण आरक्षित ३२५, अंशतः आरक्षित ४४ अशा २६७१ गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्याखालोखाल मुंबई विभागात गट आरक्षण १५९६, पूर्ण आरक्षित २०४, अंशतः आरक्षित १० अशा १८१० गाड्या फुल्ल झाल्या आहेत. पालघर विभागात गट आरक्षण ५२७, पूर्ण आरक्षित ३३, अंशतः आरक्षित आठ अशा ५६८ गाड्या फुल्ल झाल्या आहेत.