भिवंडी: भिवंडी शहरास पाणीपुरवठा करणारा महानगरपालिकेचा एकमेव वऱ्हाळा देवी तलाव गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काठोकाठ भरला असून आता त्यामधील पाणी ओसंडून वाहत आहे.
दररोज या तलावातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिका इतर मार्गाने शहरातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी विकत घेत असून महानगरपालिकेने आधीच नियोजन केले असते तर हे वाया जाणारे पाणी साठवून ते नागरिकांना पिण्यासाठी वापरू शकले असते.
भिवंडीतील कामतघर परिसरात महानगरपालिकेचा सुमारे ५७ एकरचा वऱ्हाळादेवी तलाव असून त्यापैकी सध्या ५४ एकर जागेत तलावामध्ये पावसाचे पाणी साचते. या तलावात पाणी साचण्याची क्षमता ६२८५ मिलिलिटर असुन पावसाळ्यात या तलावात पूर्णपणे भरल्यामुळे ही क्षमता संपते आणि त्यानंतर पावसाचे पाणी ओसंडून वाहते. भिवंडी मनगरपालिका असताना शहराची लोकसंख्या कमी होती. त्यामुळे विस्तृत अशा तलावाचे पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरत होते. मात्र शहराची लोकसंख्या वाढली. नगरपालिकेची महानगरपालिका झाली अन तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली तलावात अतिक्रमण झाले. परिणामी तलावात पाणी साचण्याची क्षमता कमी झाली.
३० वर्षांपूर्वी शहरास दररोज २५ एमएलडीपेक्षा जास्त पाणीपुरवठा करणारा तलाव सध्या प्रतिदिन ३ ते ५ एमएलडी पाणी शहरातील नागरिकांसाठी पुरवत आहे. त्यामुळे मनपा स्टेमकडून ७३ एमएलडी आणि मुंबई महानगरपालिकेकडून ४२ एमएलडी पाणी विकत घेत आहे. त्यामध्ये देखील पाणी चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे पथकाच्या कारवाईनंतर दिसून येते.
भिवंडीत सध्या मोठ्या संख्येने विकास कामे होत असल्या बहुमजली इमारतींची कामे सुरु आहेत. अशा स्थितीत पाणी साठविण्याचे आणि पुरवठा करण्याचे नियोजन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने करणे आवश्यक आहे. गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांकडून वऱ्हाळा तलावातील अनावश्यक अतिक्रमणे दूर करून, तलावाची खोली वाढवावी. तलावातील प्रदूषण नष्ट करावे. तसेच तलावाची पाण्याची क्षमता देखील वाढविण्याची मागणी केली जात आहे. ही क्षमता वाढविल्यास किमान शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करता येईल.
भिवंडी महानगरपालिकेच्या वऱ्हाळा तलावातील गाळ काढून त्याची खोली वाढविणे आणि सुशोभीकरण करण्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडे प्रयोजन देऊन मागणी केली आहे. हा निधी आल्यावर हे काम करून तलावात पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे, अशी माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी दिली.