महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लांबणीवर टाकलेला नाही. निवडणूक काळात भाजपाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, ते पूर्ण करणार आहोत. गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना बावनकुळेंनी शेतकरी कर्जमाफीबद्दल भाष्य केले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “योग्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावर सरकार भर देत आहे. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. ती समिती शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करणार असून, त्या सर्वेक्षणानंतर गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. कर्जमाफी ही मेरिटवर झाली पाहिजे. ज्यांना खऱ्या अर्थाने मदत हवी आहे, अशा शेतकऱ्यांचा विचार केला जाईल. समाजातील सर्वात शेवटच्या घटकाला मदत करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

गुंठेवारीमध्ये अडकलेल्या घरमालकांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे ज्या मिळकतींची नोंदणी होत नाही, अशा घरमालकांच्या समस्यांवर लक्ष दिले जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांना २०११ पूर्वीच्या गुंठेवारीतील बांधकामांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जास्त आकारणी केली असल्यास ती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा विचार आहे”, अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.

“महसूल विभागातील अनेक जागांवर झालेली अतिक्रमणे, वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रूपांतरित करणे आणि पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे यांसारख्या विषयांवर काम सुरू आहे. शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणाऱ्या ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची अट रद्द करण्यात आली आहे. घर बांधण्यासाठी लागणाऱ्या मुरमासाठी रॉयल्टी घेतली जाणार नाही. तसेच सिंधी समाजाला जागा मिळवून देण्यात आली आहे”, महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले.