* जिल्हाधिकार्यांसह सर्व यंत्रणा खड्डेमुक्तीसाठी रस्त्यावर
* एक मार्गिका राहणार बंद
ठाणे: घोडबंदर आणि गायमुख रस्त्याची चाळण झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरल्या असून शुक्रवारपासून तीन दिवस २४ तास या मार्गाच्या खड्डेमुक्तीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी या काळात एक मार्गिका पूर्णपणे बंद राहणार आहे.
घोडबंदर-गायमुख मार्ग खड्ड्यात गेल्यावरून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कानउघडणी केल्यानंतर ठाणे जिल्हाधिकार्यांसह संपूर्ण संबंधित यंत्रणा कामाला लागली आहे. कोणत्याही परिस्थितीत पंधरा दिवसांत या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान या यंत्रणेसमोर आहे. त्यासाठी सर्वप्रथम या मार्गावरील चाळण झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यात येणार आहे. एकही खड्डा राहता कामा नये आणि पुन्हा पडता कामा नये या तत्वावर शुक्रवारपासून तीन दिवस २४ तास या मार्गावर काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक विभाग ब्लॉक घेणार असून लवकरच यासंबधीची आधीसुचना काढण्यात येणार आहे.
सोमवारी ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी, वाहतूक पोलिस आणि संबंधित अधिकार्यांची तातडीने बैठक घेऊन कानउघडणी केली. त्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी बैठकीनंतर लगेचच घोडबंदर मार्गावरील तत्वज्ञान विद्यापीठ ते भाईंदरपर्यंत तत्काळ स्थळपाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, ठाणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता संजय कदम, तहसिलदार उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे, शाखा अभियंता प्रसाद सनगर व इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्थळपाहणीनंतर पुढील अॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी संबंधित सर्व अधिकार्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात रात्री उशिरा बैठक घेतली. रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार ८ ऑगस्टपासून पुढील तीन दिवस रस्ते वाहतूक अंशतः ब्लॉक करण्याचा निर्णय झाला. सार्वजनिक बांधकाम विभाग, मीरा-भाईंदर बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वनविभाग अशा सर्व विभागांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीने या समस्येचे निराकरण पुढील पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत करण्याचे ठरले.
गायमुख घाटात ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. वनविभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा रस्ता काँक्रीटचा करणे शक्य नाही. त्यामुळे सध्यातरी या ठिकाणी पडलेले खड्डे बुजवून दिलासा देणे हा एकमेव पर्याय आहे. पण त्यासाठी देशातील सर्वोत्तम असे टिकाऊ तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खड्डे मुक्तीची ही मोहिम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. २४ तास न थांबता हे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यतेनुसार एक मार्गिका बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार, रविवार या मार्गावर रहदारी कमी असते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून रविवारी रात्रीपर्यंत वाहतूक विभाग ब्लॉक घेण्याची शक्यता आहे. या कालावधीत या मार्गावरील सर्व खड्डे भरले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.