ठाण्यात साडेतीन कोटींचा चरस हस्तगत

ठाणे: उत्तर प्रदेश येथून ठाण्यात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीला ठाण्याच्या अमली विरोधी पथकाच्या पोलिसांनी उथळसर येथे बेड्या ठोकून त्याच्याकडून तीन कोटी ३९ लाखांचा चरस जप्त करुन आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला.

मोहमद मकसूद मोहंमद (४२)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ट्रकचालक आहे. उत्तर प्रदेश येथिल प्रयागराज जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. उथळसर नाका येथिल पोळी-भाजी केंद्र येथे आरोपी ३१ जुलै रोजी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मकसूद याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये तीन कोटी ३९ लाख रुपये किमतीचा तीन किलो ३५० ग्राम वाजनाचा चरस त्यांच्याकडे सापडला असून त्याच्या विरोधात राबोडी पोलिस ठाण्यात अमली विरोधी कायद्यातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपीकडून आधारकार्ड, १७७० रुपये रोख आणि वाहन चालवण्याचा परवाना आदी पोलिसांनी जप्त केले असून या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने चरस कोठून आणला त्याची चौकशी पोलिस करत आहेत