अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी बुधवारी (३० जुलै) मोठी घोषणा केली आहे. येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नाहीत.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आमचा मित्र आहे, परंतु, त्यांनी आमच्यावर खूप जास्त टॅरिफ लावलं आहे. जे जगातील सर्वाधिक टॅरिफपैकी एक आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याबरोबर फारसा व्यापार करू शकलो नाही. याशिवाय भारताकडून अनेक आर्थिक अडथळे निर्माण केले जात आहेत. इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत ते खूपच त्रासदायक आहेत.”

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “भारत गेल्या अनेक वर्षांपासून बहुतेक लष्करी उपकरणं, शस्त्रं रशियाकडून खरेदी करत आला आहे. तसेच ऊर्जा खरेदीतही भारत चीनबरोबर रशियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. रशियाचा युक्रेनमध्ये हैदोस चालू आहे. रशियाचा युक्रेनमधील विध्वंस थांबावा यासाठी सगळं जग प्रयत्न करत आहेत. अशा वेळी भारताने रशियाला अशा प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देणं योग्य नाही. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के टॅरिफ व तथा दंड भरावा लागेल. वर नमूद केलेल्या कारणांसाठी भारताला दंड भरावा लागेल.”