एसटी बसची दुरुस्ती होईना; आरटीओचा दंड सोसवेना!

एसटी चालकांचा विभाग नियंत्रकाला घेराव

ठाणे : एसटी प्रशासनाच्या चुकीमुळे चालकांकडून मनमानी दंड वसुल केला जात असल्याचा निषेध करत एसटी चालकांनी आगार नियंत्रकाला घेराव घातला. एकेका मिनिटावर चालकाला चार-चार हजार रुपयांचा दंड कसा येतो, असा संताप व्यक्त करत ठाणे आगार क्रमांक 1- मधील चालकांनी दंड भरण्यास नकार देत भरलेला दंड परत करण्याची मागणी केली.

राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या ठाणे आगार क्रमांक 1 मधून यशवंतराव चव्हाण पूर्व द्रुतगती लांब पल्ल्याच्या बस धावतात. या मार्गावर बस चालकांना मोठ्या प्रमाणात दंड येत आहे. तो दंड बस चालकाच्या पगारातून परस्पर कापला जातो. एकेका चालकाला दीड लाखांपर्यंतचा दंड भरावा लागत असल्याने बस चालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

बसचे स्पिडो मीटर बंदवस्थेत आहेत, स्पीड लॉक असणाऱ्या बसला सुद्धा जास्त वेगाचे नियम मोडल्याचे दंड येत आहेत. पूर्व द्रुतगती महामार्गवर आरटीओकडून बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांमध्ये बसच्या हालचाली टिपल्या जात आहेत. मात्र एसटीच्या कार्यशाळेत बसची दुरुस्ती व्यवस्थित केली जात नाही. त्याचा भुर्दंड चालकांना भरावा लागत आहे. खासगी सावकारापेक्षाही भयानक पद्धतीने एसटी प्रशासनाकडून दंडाची वसुली केली जाते. त्याविरोधात (ता.25) संतप्त एसटी चालकांनी आगार व्यवस्थापकाला घेराव घालत हा दंड भरण्यास नकार दिला.

एसटीच्या कार्यशाळेत बसची दुरुस्ती योग्य पद्धतीने केली जात नाही. त्यामुळे बस किती वेगाने आहे याची कल्पना चालकाला येत नाही. यात आमचा काय दोष असा सवाल उपस्थित करत योगेश कालाप्पा यांनी सांगत मला दीड लाखांचा दंड आला. आहे, तो कसा भरणार, आमची परिस्थिती कर्जबाजारी शेतकऱ्यांपेक्षा वाईट झाली आहे. असे सांगितले. तर एस एम सय्यद या बस चालकाला या मार्गावर अवघ्या दोन-तीन मिनिटांच्या अंतराने दंड आले आहेत. अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर बस चालवत असताना 16 हजारांहून जास्त रुपयांचा दंड आला आहे. दोन दिवसात त्यांच्या नावाने 44,129 रुपयांचा दंड आला आहे.

आरटीओकडून 15 मिनिटांच्या अंतरावर कॅमेरे बसवले आहेत का, असेल तर एसटी चालकांकडून जबरी पैसे वसुल करण्याचा हा स्कॅम आहे असा आरोप विभागीय सचिव अंकुश बिडगर यांनी केला. यावेळी आगार नियंत्रक सचिन पवार यांना दंड माफी आणि पगारामधून कापून घेतलेला दंड परत करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे ठाणे आगार – 1चे अध्यक्ष प्रमोद घाटेराव, सचिव अंकुश बिडगर, सहसचिव नंदकुमार देशमुख, माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप, उपाध्यक्ष दया सुरवसे हे पदाधिकारी आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.