ठाणे: कामानिमित्त दूर परदेशात किंवा इतर राज्यात राहणाऱ्या भावांपर्यंत बहिणींच्या राख्या पोहचवण्यासाठी भारतीय पोस्ट विभाग सज्ज झाले आहे. बहिणीची राखी लवकरात लवकर आणि योग्य पत्त्यावर पोहचवण्यासाठी पोस्टाने आकर्षक रंगीबेरंगी असे ‘राखीचे लिफाफे’ तयार केले आहेत. हे लिफाफे सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध झाले असून बहिणींनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोस्टाकडून करण्यात आले आहे.
यंदा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने सर्व बहिणींची उत्सुकता वाढली आहे. मात्र कामानिमित्त बाहेर असलेल्या आपल्या लाडक्या भावाला राखी पोहचवता यावी यासाठी वर्षानुवर्षे पोस्ट विभाग सेवा पुरवत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे टपाल विभाग रक्षाबंधन सणासाठी सज्ज झाले आहे. विभागाने खास डिझाईन केलेले राखी लिफाफे नागरिकांसाठी उपलब्ध केले आहेत. जे प्रथम श्रेणीचे मेल म्हणून भारतात आणि परदेशात कुठेही नाममात्र दराने पाठवले जातील. पोस्टाने हे लिफाफे रक्षाबंधनासाठी खास न फाटणारे वॉटरप्रूफ, सिल्ड असे उपलब्ध केले आहेत. या लिफाफ्यांमध्ये रंगबिरंगी आकर्षक असे लिफाफे उपलब्ध करण्यात आले आहेत. कव्हरवर राखीची डिझाइन छापण्यात असल्याची माहिती डाकघर विभागाच्या प्रवर अधिक्षक के नरेंद्र बाबु यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.
राखी लिफाफे सोयीस्कर आकारात उपलब्ध आहेत. सहज सील करण्यासाठी पील ऑफ स्ट्रिप सीलची सोय देखील करण्यात आली आहे. या राखी लिफाफ्यांची किंमत जीएसटीसह प्रति लिफाफा 12 रुपये इतकी आहे. हे राखी लिफाफे संपूर्ण भारत आणि परदेशात स्पीड पोस्ट आणि नोंदणीकृत पोस्ट सेवांद्वारे पाठविले जाऊ शकतात. राखी योग्य त्या पत्त्यावरती लवकरात लवकर पोहोचण्याकरिता पोस्ट विभागाचा हा प्रयत्न आहे.
गेल्यावर्षी पाच हजारहून अधिक पोस्ट पाकिटाची विक्री झाली होती. तर यंदा 3200 लिफाफे उपलब्ध करण्यात आले असून सात हजार नवीन डिझाईन केलेल्या पाकिटाची विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बहिणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर प्रवर अधिक्षक के नरेंद्र बाबु यांनी केले आहे.