ठाण्यातील तिसरे नाट्यगृह कावेसरमध्ये!

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा पुढाकार

ठाणे : ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन आणि पोखरण रोड भागातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणेकरांची नाट्यभूक भागवत असले तरी हे दोन्ही नाट्यगृह सध्या दुरुस्तीच्या फेऱ्यात आहेत. अशावेळी दुसरे ठाणे म्हणून ओळख मिळालेल्या घोडबंदर परिसरात कावेसर येथे सुविधा भूखंडावर ठाण्यातील तिसरे नाट्यगृह उभे करण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे.

मासुंदा तलावाजवळ असलेले राम गणेश गडकरी रंगायतन आणि पोखरण रोड येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीच्या फेर्‍यात अडकले आहे. शिवाय घोडबंदरवासियांसाठी ही दोन्ही नाट्यगृहे लांब आहेत. वास्तविक घोडबंदर भागाची लोकसंख्या आता वाढली आहे. मोठ्या प्रमाणात येथे नागरिकरण झाले आहे. अनेक सोयी-सुविधा येथे उभ्या राहत आहेत. यामध्ये नाट्यगृहाची कमतरता भासत आहे, त्यामुळे येथे नाट्यगृह सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्तांना घोडबंदर भागात नवीन नाट्यगृह उभारण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

घोडबंदर परिसरातील मौजे कावेसर येथील विकास प्रस्तावअंतर्गत ७३४३.३२ चौरस मीटर सुविधा भुखंड प्राप्त होणार आहे. या सुविधा भुखंडावर हे नवीन नाट्यगृह उभारण्यास मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे.