येऊरमधील ७५ एकर वनजमिनी खासगी लोकांच्या ताब्यात?

बिबटे कमी झाले, भूमाफिया वाढले-आ.जितेंद्र आव्हाड

ठाणे: येऊरमधील अनधिकृत बांधकामे आणि अवैध व्यवसाय यांचे सर्वेक्षण आणि कारवाई यासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी येऊरमधील सुमारे ७५ एकर वनजमिन खासगी लोकांच्या ताब्यात असल्याचा गंभीर आरोप केला आहे आहे. येथील बांधकामांची पाहणी करताना त्यांनी बिबटे कमी झाले पण भूमाफिया वाढले, असा खोचक टोलाही लगावला आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येऊर वन परिक्षेत्र आहे. या भागात जैवविविधता आहे. परंतु गेल्याकाही वर्षांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररित्या ढाबे, हाॅटेल उभे राहिले. काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केले आहेत. येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पार्ट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येथे मद्याच्या पार्ट्या देखील केल्या जातात. परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली. त्यामुळे येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सोमवारी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टिका केली.

येऊरचे निसर्ग सौंदर्य नष्ट होत आहे. सुमारे ७५ एकर वन जमीन खासगी लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत. काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमीनींचा ताबा घेण्यात आला. वन जमीनीवर आता राज महल उभे राहायला लागले आहेत. कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे. ठाणे महापालिका गरीबांची बांधकामे तोडत आहे. पण मग येऊरमधील धनदांडग्यांचे बंगले दिसत नाहीत का? असा सवाल आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाला उद्देशून उपस्थित केला.

येऊरमध्ये एक व्यक्ती गुंड घेऊन येतो आणि आदिवासींना बाहेर काढून जमीनीचा कब्जा घेतो असा आरोपही त्यांनी केला. पूर्वी येऊरच्या रस्त्यावर बिबटे फिरायचे. आता बिबटे दिसत नाहीत. येथे लाॅन्स उभारण्यात आले आहेत. तेथे विवाहासाठी परवानगी कशी दिली जाते, असेही आव्हाड म्हणाले. जमीनीसंदर्भाच्या तक्रारी पोलिसांकडे जातात. पण तक्रारी घेतल्या जात नाहीत. ठाण्यातील एक मोठा विकासक बंगला बांधत असल्याचा आरोपही श्री.आव्हाड यांनी केला आहे.